पुण्यात नवले पुलाजवळ भीषण अपघात; 4 ठार, 18 जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे-बंगळुरू महामार्गावर नवले पुलाजवळील स्वामी नारायण मंदिराजवळ ट्रकचालकाने खासगी आरामदायी बसला दिलेल्या धडकेत चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर 18 जण जखमी झाले आहेत. रविवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास अपघात घडला. वाहनात अडकलेल्या 18 प्रवाशांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले. ट्रक आणि बस दोन्ही वाहने उलटल्याने चालक आणि प्रवाशांना वाचविण्यासाठी अग्निशमन दलाकडून दोन तास बचावकार्य सुरू होते.

कोल्हापूरहून मुंबईकडे साखरेची पोती घेऊन निघालेल्या ट्रकचालकाचे नवले ब्रिज परिसरात उतारावर नियंत्रण सुटले. त्यामुळे त्याने पुढे जात असलेल्या खासगी आरामदायी बसला जोरात धडक दिली. त्यामुळे ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला. अपघातात ट्रक उलटल्याने केबिनमध्ये चालक अडकला होता. धडकेत खासगी बसही उलटली. रवींद्र वासुदेव कोरगावकर (46), सुवर्णा वासुदेव कोरगावकर (85, दोघेही रा. दाजीपुरा, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर), निशा प्रमोद भाटकर (36, रा. शास्त्रीनगर, कोल्हापूर) आणि अरुण गोपीनाथ सावंत (54,  कल्याण पूर्व, मुंबई) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मृतांच्या आणि जखमींच्या नातेवाईकांना तातडीने मदतीची मागणी केली.