जालना मंठा रोडवर रातराणी बसचा अपघात, 25 प्रवासी जखमी

जालना जिल्ह्यातील मंठा शहरापासून 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या केंधली येथील पुलाजवळ 8 ऑगस्ट, मंगळवार रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास मुंबई – पुसद रातराणी एसटी बस जालन्याकडे जात असताना अचानक ट्रक समोरून आल्याने बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस पुलाजवळील 15 ते 20 फूट खड्ड्यात कोसळून अपघात झाल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांसह केंधळी येथील गावातील नागरिक व मंठा पोलिसांसह शहरातून आलेल्या युवकांनी बसमध्ये जखमी झालेल्या जखमींना बाहेर काढून उपचारासाठी मंठा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. या अपघातामध्ये 20 ते 25 जण जखमी झाले असून यातील काही जखमींना पुढील उपचारासाठी जालना येथील रुग्णालयात पाठविले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.या अपघातामध्ये एका 4 महिन्यांच्या मुलाचा समावेश आहे. हा मुलगा सुदैवाने सुखरूप आहे. या अपघातामध्ये 25 जण जखमी झाले आहेत तसेच बाकी प्रवासी सुखरूप आहेत.जखमी प्रवाशांमध्ये 4 महिन्यापासून ते 75 वर्षापर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे.