पदवी प्रवेशासाठी रोजगारक्षम अभ्यासक्रमांना मागणी, पहिली गुणवत्ता यादी जाहीर

पारंपरिक अभ्यासक्रमाच्या तुलनेत व्यावसायिक आणि रोजगारक्षम अशा अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याकडे याही वर्षी विद्यार्थ्यांचा कल वाढलेला दिसून येत आहे. त्यामुळे प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी अकाऊंट अॅण्ड फायनान्स, बँकिंग अॅण्ड इन्शुरन्स, मॅनेजमेंट स्टडीज, बायोटेक्नॉलॉजी अशा अभ्यासक्रमांचा कटऑफ वाढलेला दिसून आला.

उदाहरणार्थ हिंदुजा कॉलेजमध्ये पारंपरिक अभ्यासक्रम बीकॉमचा पहिल्या यादीचा कटऑफ गेल्या वर्षी 74 टक्के होता, तो यंदा 71 वर आला आहे. तुलनेत अकाऊंट अॅण्ड फायनान्सचा 87 वरून 90 टक्क्यांवर गेला आहे. बँकिंग अॅण्ड इन्शुरन्सचा 68 वरून 79 टक्क्यांवर गेला आहे. झेव्हियर्ससारख्या नामांकित कॉलेजात डेटा सायन्सची कटऑफ 95-96 टक्के आहे. थोडय़ाफार फरकाने अन्य कॉलेजमध्येही हेच चित्र आहे.

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थामध्ये शैक्षणिक वर्ष 2025-2026 साठी तीन आणि चार वर्षीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी आज पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली. एकूण 2 लाख 53 हजार 370 विद्यार्थ्यांनी प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणी केली आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांसाठी 8 लाख 11 हजार 643 एवढे अर्ज सादर केले आहेत. सर्वाधिक अर्ज बीकॉमला आहेत. त्याखालोखाल बीकॉम (अकाऊंट अॅण्ड फायनान्स), बीएस्सी आयटी, बीए या अभ्यासक्रमांना पसंती दर्शवली आहे.

अभ्यासक्रमनिहाय विद्यार्थ्यांचे अर्ज

z बीकॉम – 1,51,902 z बीकॉम (मॅनेजमेंट स्टडीज) – 54,238 z बीकॉम (अकाऊंट अॅण्ड फायनान्स) – 1,13,392 z बीए – 83,630 z बीएस्सी आयटी – 86,976 z बीएस्सी – 34,987 z बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स – 67,423 z बीएएमएमसी – 26,416 z बीकॉम (बँकिंग अॅण्ड इन्शुरन्स) – 22,200 z बीकॉम (फायनान्शिअल मार्पेट) – 28,423 z बीएस्सी (बायोटेक्नॉलॉजी) – 22,578 z बीएस्सी (डेटा सायन्स) – 15,230 z बीएस्सी (एआय) – 6,120