
नेवासा तालुक्यातील चांदा येथे कर्डीले वस्तीवर दरोडा टाकून खून केल्याप्रकरणी बाबाखान शिवाजी भोसले (वय 45, रा. गोंडेगाव, ता. नेवासा, जि.नगर) या आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कर्जत तालुक्यातील कुळधरण येथून त्याला शिताफीने अटक केली. दरम्यान, या गुन्ह्यात दोन ते तीन आरोपी असल्याचा अंदाज पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी व्यक्त केला.
गंगाधर कर्डीले व बापु कर्डीले हे रात्री घराबाहेर झोपले असताना अज्ञात व्यक्तींनी दरोडा टाकून ओंकार गंगाधर कर्डीले याचा खून केला होता. तसेच अर्चना कर्डीले यांच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने ओढून नेले होते. 2 मार्च रोजी ही घटना घडली होती. नवनाथ ज्ञानदेव कर्डीले यांच्या तक्रारीवरुन सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना आरोपींचा शोध घेत कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
आरोपी बाबाखान शिवाजी भोसले हा कुळधरण रोड येथे विटभट्टीवर काम करत असल्याची माहिती अनिल कटके यांना मिळाली. त्यानंतर पथकातील अधिकारी व अंमलदारांनी त्यास शिताफीने अटक केली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. चौकशीमध्ये तो मोक्का, दरोडा व जबरी चोरी अशा 4 गुन्ह्यात फरार असल्याचे उघड झाले. तसेच त्याच्या विरोधात नेवासा व शनी शिंगणापूर पोलीस ठाण्यात घरफोडीचेही 8 गुन्हे दाखल आहेत. त्याला ताब्यात घेत सोनई पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. पुढील कारवाई सोनई पोलीस ठाणे करीत आहे.





























































