कांदिवलीतील रेकॉर्डवरच्या गुन्हेगाराच्या हत्येचा कट उधळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई 

कांदिवली पूर्वेकडे राहणाऱया सराईत कान्या पांडे या गुन्हेगाराची हत्या करण्याचा कट शिजला होता. आरोपीने बाहेरचे दोन गुंड मुंबईत बोलावून त्यांना शस्त्र देऊन तयार ठेवले होते; मात्र मुंबई गुन्हे शाखेला ही माहिती मिळाली आणि खंडणीविरोधी पथकाने वेळीच आरोपींच्या मुसक्या आवळल्यामुळे तो बचावला.

 त्याचा गणेश ठाकूरशी असलेला वाद विकोपाला गेल्यामुळे गणेशने पांडेचा काटा काढायचा प्लॅन रचला. ही खबर खंडणीविरोधी पथकाला मिळाली.  उपायुक्त दिलीप सावंत, प्रभारी पोलीस निरीक्षक अजय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन कदम, अरविंद पवार, एपीआय वंजारी, राजू सुर्वे व पथकाने गणेश ठाकूर व त्याच्या साथीदारांना वेळीच रोखण्याचे प्रयत्न सुरू केले. हे पथक लगेच समतानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडकले. कान्या पांडे याच परिसरात राहत असून त्याच्याकडे पांढऱया रंगाची फॉर्च्युनर गाडी असल्याचे समजले. तर गणेश ठाकूरदेखील पांढऱया रंगाची फॉर्च्युनर वापरत असल्याचे पोलिसांना समजले.

7 तारखेला दुपारनंतर पांडेचा गेम होणार होता

अधिक तपास केला असता गणेशने मुंबईबाहेरून दोन गुंड बोलावले असून त्यांना आकुर्ली मार्गावर असलेल्या अनिता नगरातील इमारत क्रमांक 7 मधील रूम नंबर 103 मध्ये राहण्याची व्यवस्था केल्याचे समोर आले. 7 ऑक्टोबर रोजी दुपारनंतर पांडेची हत्या करण्याचे ठरले होते. मात्र त्याआधीच पोलिसांनी गणेश ठाकूर (42), सोमेश्वर ऊर्फ संतोष बैरागी (42), सागर मोरे (30) या तिघांना पकडले. त्यांच्याकडून दोन देशी बनावटीची पिस्तुले, 12 जिवंत काडतुसे, एक चॉपर, सहा मोबाईल, पांडेच्या फोटोची कलर झेरॉक्स आरोपींकडून हस्तगत केली आहे.