
पुर्ववैमनस्यातून एकावर कोयत्याने जिवघेणा हल्ला करणार्या चौघांना खडक पोलिसांच्या पथकाने अटक केली. घटनेनंतर 24 तासांच्या आत आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. अनिकेत व्यंकटेश कोळी (21), शैलेश उर्फ साहील रामप्पा बॅगरी (21), अजय रामप्पा बॅगरी (20), भरत व्यंकटेश कोळी (19) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत 26 वर्षीय तरूणाने फिर्याद दिली आहे.
फिर्यादी तरूण व आरोपी एकमेकांच्या परिचयातील असून त्यांच्यात तीन महिन्यांपुर्वी वाद झाले होते. याच रागातून दोन दिवसांपुर्वी आरोपींनी फिर्यादीशी वाद घातला. फिर्यादीवर कोयत्याने जिवघेणा हल्ला केला. यामध्ये फिर्यादी तरूण जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच खडक पोलिसांच्या पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींना अवघ्या 24 तासांत जेरबंद केले. खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता यादव, पोलीस निरीक्षक राजेश तटकरे, सहायक निरीक्षक राकेश जाधव, पोलीस उपनिरीक्षक अतुल बनकर, अंमलदार अजीज बेग, संदीप तळेकर, विशाल जाधव, महेश पवार, महेश जाधव, योगेश चंदेल यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.


























































