
कर्नाटकातील गदग येथील सराफी दुकान फोडून दागिन्यांसह पळणाऱया चोरटय़ास वडगाव पोलिसांनी किणी टोल नाक्यावर सापळा लावून पकडले.
महंमद हुसेन (रा. नागपूर वाला चाळ, अहमदाबाद) असे चोरटय़ाचे नाव असून, त्याच्या ताब्यातून 86 लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले. बुधवारी पहाटे गदग येथील शांतीदुर्ग ज्वेलर्स येथे चोरी करून हुसेन 19 किलो चांदीचे दागिने, 7 तोळे सोने व मौल्यवान खडे व इतर दागिने घेऊन बेळगावमार्गे कोल्हापूर ते पुणे असा पोबारा करण्याच्या प्रयत्नात होता. त्याच्याबाबत खबऱयामार्फत कर्नाटक पोलिसांना खबर मिळताच त्यांनी कोल्हापूर पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली.
जिल्हा पोलीस प्रमुखांनी वडगाव पोलिसांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माधव डिगोळे, सहायक फौजदार आबा गुंडणके, महेश गायकवाड, अनिल आष्टेकर, राजू साळुंखे आदींनी किणी टोल नाक्यावर सापळा लावत कर्नाटक परिवहनच्या बसमधून महंमद हुसेन याला पकडले. त्याच्याकडून 86 लाख रुपयांचे दागिने व रोख रक्कम ताब्यात घेण्यात आली.
बुधवारी सायंकाळी गदग येथील उपविभागीय पोलीस अधिकारी मुरतजा काद्री, पोलीस निरीक्षक धीरज शिंदे व त्यांच्या सहकाऱयांनी वडगाव पोलीस ठाण्यात येऊन आरोपीस मुद्देमालासह ताब्यात घेतले.




























































