‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादामुळेच यश मिळवले’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विजय जोशी । नांदेड

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1987 ला माझ्या मेंदीच्या पानावर कार्यक्रमाला उपस्थित राहून दिलेली दाद आणि त्यानंतर दिलेले आशीर्वाद त्या बळावरच मी निवेदकाची भूमिका करत आहे. या कार्यक्रमाला जनतेनेचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वयाच्या 65 व्या वर्षी वेगवेगळ्या दोन हजार कार्यक्रमाचे निवेदन मी केले आणि रसिकांचे पाठबळही मला मिळाले अशा शब्दात प्रख्यात निवेदक बच्चू पांडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. श्रीक्षेत्र माळेगावच्या खंडोबा यात्रेत लावणी महोत्सवात गेल्या सात वर्षापासून निवेदनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या बच्चू पांडे यांच्याशी संवाद साधताना त्यांनी या भावना व्यक्त केल्या.

1987 ला कॅसेटच्या माध्यमातून आम्ही सात आठ मित्रांनी काही कार्यक्रम केले. रसिकांना ती गाणी आवडू लागली. तीच गाणी कॅसेटच्या रुपानेसमोर आणली. त्याचे नाव होते मेंदीच्या पानावर…या कॅसेटने जगभर धमाल केली आणि विशेष म्हणजे त्यात निवेदन माझे होते. यानंतर पारंपरिक लावणी कार्यक्रमाकडे वळलो. माया जाधव आणि सुरेखा पुणेकर यांच्या ‘सोळा हजारात देखणी’ या कार्यक्रमाचे तब्बल दोन हजार प्रयोग राज्यात आणि परदेशातही झाले. यात मी समाधानी आहे, असे पांडे म्हणाले.

मुळात मी नाट्यकलावंत असलो तरी सरस्वतीचे वरदान आणि आवाजाची देणगी मिळाल्याने मी निवेदनाकडे वळलो. पारंपारिक लावणीचा बाज व त्याचा अभ्यास व मनोरंजनात्मक सादरीकरण करुन रसिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले. यानंतर लावणीचे स्वरुप बदलले. आला बाबूराव …मला आमदार झाल्यासारखं वाटतंय… या व इतर लावण्याची मागणी प्रेक्षक करु लागले. असे असले तरी आकलूजच्या लावणी महोत्सवाने आपले वेगळे वैशिष्ट्यं कायम ठेवले. या महोत्सवात पारंपारिक लावणीलाच महत्त्व दिले जाते. ही बाब चांगली आहे,असेही ते म्हणाले. मी आणि माझा मानसपुत्र योगेश देशमुख याने लावणीसाठी नाटक लिहिले त्याचे नाव होते ‘या रावजी बसा भावजी’ त्याला महाराष्ट्रभर रसिकांनी डोक्यावर घेतले. आता त्यात थोडा बदल करत ‘तुमच्यासाठी काय पण’ हा कार्यक्रम पूनम कुडाळकर आणि संचासोबत सुरु केला असून त्यालाही रसिकांनी उस्फूर्त दाद दिली आहे.

ज्येष्ठ कलावंत गणपत पाटील यांचे निधन झाल्यानंतर त्यांना दोन महिन्यानंतर मानधन सुरु झाले होते. असे काही ज्येष्ठ कलावंत, कलाकार यांच्यासोबत घडू नये असे वाटते. आता मी देखील 65 वर्षाचा झालो असून मला अजूनही शासनाकडून काहीच मदत मिळाली नाही. शासनाच्या अटी जाचक असल्यामुळे त्याचा त्रास मलाही होत आहे. ज्येष्ठ कलावंत यांना तत्काळ राहण्यासाठी जागा आणि मानधन दिले जावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.