अग्निशमन यंत्रणेतील त्रुटींमुळे मुंबईतल्या 24 रुग्णालयांवर कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील एकूण 1544 रुग्णालयांपैकी 687 रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षा यंत्रणेत त्रुटी आढळल्या  आहेत. या रुग्णालयांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यापैकी 663 रुग्णालयांनी आपल्या त्रुटींची पूर्तता केली असून 24 रुग्णालयांनी मात्र याकडे दुर्लक्ष केल्यामुळे या रुग्णालयांवर महापालिकेमार्फत कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी उत्तरात दिली.

भाटिया रुग्णालयाजवळील सचिनम हाइट्स या इमारतीला नुकतीच आग लागली होती. या इमारतीत अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित नसल्यासंदर्भात अमित साटम, मंगलप्रभात लोढा, रोहित पवार, रईस शेख आदींनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर दिलेल्या लेखी उत्तरात एकनाथ शिंदे यांनी वरील माहिती दिली. सचिनम हाइट्स इमारतीच्या आगीप्रकरणी मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी चौकशी करण्याचे आदेश दिले असून उपआयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची नियुक्ती केली असून प्राथमिक चौकशीची कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याची माहिती त्यांनी दिली. तर राज्यातील 528 पैकी 438 आरोग्य संस्थांना अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी निधी मंजूर केल्याची माहिती यावेळी दिली आहे.