
मुंबई महानगरपालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील वारंवार गैहजर राहणाऱ्या डॉक्टर, परिचारिका तसेच चतुर्थश्रेणी पदावरील कर्मचाऱ्यांना तात्काळ नोटीस द्या, असे आदेश महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले. महापौरांनी मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख रुग्णालयातील अधिष्ठातांची आज भायखळा येथे आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले.
यावेळी महापौरांनी उपस्थितांना काही सूचनाही केल्या. प्रमुख रुग्णालयातील मृतदेहांची ताबडतोब विल्हेवाट लावणे आवश्यक असून संबंधित पोलीस ठाण्याबाबत काही अडचण असल्यास रुग्णालयनिहाय यादी सादर करावी, मुंबई पोलीस आयुक्तांसोबत चर्चा करून हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढणार असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले. आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले यांनी मृत पावलेल्या व्यक्तींचे मृत्युचे प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी येत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. याबाबत मृत व्यक्तीचे आजारासंबंधित कागदपत्रे तपासून पालिकेच्या रुग्णालयातर्फे मृत्यु प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे अधिष्ठाता यांनी सांगितले.






























































