दिवसभरात लाखो रुपयांचा ड्रग्जसाठा पकडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकांनी गुरुवारी शहरात धडाकेबाज कारवाया केल्या. वरळी, वांद्रे आणि कांदिवली युनिटने दिवसभरात ठिकठिकाणी ड्रग्ज पेडलर्सचे कंबरडे मोडत लाखो रुपयांचा ड्रग्जचा साठा जप्त केल्या. त्यात एलएसडी, एमडीएमए यासारख्या पार्टी ड्रग्जचादेखील समावेश आहे.

वरळी युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय मराठे, चव्हाण आणि पथकाने लोअर परळच्या मथुरादास मिल कंपाऊंडच्या गेटजवळ एक तरुणाकडील पाऊचची तपासणी केली असता त्यात 81 एलएसडी पेपर आणि 27 इक्टसी पिल्स असा 2 लाख 39 हजार 770 रुपयांचा पार्टी ड्रग्ज सापडला. लक्ष्मणन राजन पादुकोदे ऊर्फ निखिल (18) असे त्या पेडलरचे नाव असून तो पब, डिस्को तसेच उच्चभ्रू नशेबाजांना हे महागडी ड्रग्ज पुरविण्याचे काम करतो.

अंधेरीत पाच लाखांचे एमडी जप्त

वरिष्ठांच्या सूचनेनुसार वांद्रे युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक वाढवणे, एपीआय बंडगर आणि उपनिरीक्षक पावले व पथक अंधेरी पश्चिमेकडे गस्त घालत असताना सिंडिकेट बँकेच्या समोर नायजेरियन तरुणाची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ पाच लाख किमतीचा 250 ग्रॅम एमडीचा साठा मिळून आला. चिनोन्सो उदेगू (26) असे त्या नायजेरियन पेडलरचे नाव असून तो सध्या नालासोपारा येथे राहतो. दरम्यान, मालवणी येथे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रवीण कदम, उपनिरीक्षक भोसले व पथकाने मालवणी येथील लगून गेट परिसरात  सलिल हबिब खान ऊर्फ सलीम टेम्पो  याच्याजवळ 750 ग्रॅम चरसचा साठा मिळाला.