ओंकारसिंग टाक टोळीवर मोक्कानुसार कारवाई; पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचा तडाखा कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन लाखांची खंडणी न दिल्याच्या रागातून तरूणावर तलवारीने वार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या हडपसरमधील ओंकारसिंग टाक टोळीवर संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत मोक्कानुसार 29 वी कारवाई आहे. टोळी प्रमुख ओंकारसिंग करतारसिंग टाक (26), सोरनसिंग करतारसिंग टाक (21), अवतारसिंग करतारसिंग टाक (28), जपानसिंग करतारसिंग टाक (31), तुफानसिंग करतारसिंग टाक (30, सर्व रा. गाडीतळ, हडपसर) यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

ओंकारसिंग याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने बेकायदा टोळी तयार करून खुनाचा प्रयत्न, जबर दुखापत करून दहशत निर्माण करणे, जबरी चोरी, दरोडा टाकणे, खंडणी वसूल करणे, घातक शस्त्र विना परवाना बाळगणे तसेच नागरिकांत दहशत निर्माण करणे अशा प्रकारची कृत्ये केली होती. त्यामुळे हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोक्काचा वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविला होता. संबंधित प्रस्तावाला अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी मंजुरी दिली. गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे करत आहेत.