शाळेच्या परिसरातील पानटपऱ्यांवर कारवाई, मुंबई पोलिसांचा दणका

शाळा, महाविद्यालयाच्या 100 मीटर परिसरात विद्यार्थ्यांना मादक पेय, तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ, अंमली पदार्थ विकणाऱ्या पानटपऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई केली. परिमंडळ-5 अंतर्गत कोप्ता कायद्यांतर्गत पोलिसांनी 56 पानपटऱ्या जमीनदोस्त करून एकूण 111 एवढ्या कारवाया केल्या आहेत.

शाळा व महाविद्यालयाच्या 100 मीटर परिसरात विद्यार्थ्यांना तंबाखू, गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ, अंमली पदार्थ विकण्यास मनाई आहे. मात्र, नियम धाब्यावर बसवून विद्यार्थ्यांना सर्रासपणे हे पदार्थ विकले जात असल्याचे निदर्शनाला आले. याची गंभीर दखल घेऊन परिमंडळ-5 चे उपायुक्त गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली दादर, शिवाजी पार्क, धारावी, शाहूनगर, माहीम, कुर्ला आणि व्ही बी नगर पोलीस ठाण्याअंतर्गत विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत पालिकेच्या सहाय्याने एकूण 56 पानटपऱ्या जमीनदोस्त करण्यात आल्या. आठ आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.