महसूल बुडवणाऱ्या कंपन्यांवर कारवाई

228

पारनेर तालुक्यातील म्हसणे फाटा येथे उभारण्यात येत असलेल्या जापनीज हबमधील तीन बडया बहुराष्ट्रीय कंपन्यांनी शासनाच्या दोन कोटींचा महसूल बुडविल्याप्रकरणी तहसिलदार ज्योती देवरे यांनी कंपन्यावर शनिवारी कारवाई केली.या कारवाईत 25 पोकलेन, जेसीबी तसेच डंपर जप्त करण्यात आले असून उशिरापर्यंत पंचनाम्याचे काम सुरू होते.

उभारणी सुरू असलेल्या मायडीया, कॅरीअर व मींडा या कंपन्यांकडून उत्खनन करून वापरण्यात येत असलेल्या गौण खनिजाचे स्वामित्व भरण्यात येत नसल्याचे तहसिलदार देवरे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी गेल्या महिनाभरापासून तिन्ही कंपन्यांच्या उभारणीची प्रत्यक्ष पाहणी करून, महसूल विभागाकडे गौण खनिज उत्खननासंदर्भात घेण्यात आलेल्या परवानगीची खातरजमा करत शनिवारी तिन्ही कंपन्यांवर एकाच वेळी छापा टाकला. तेथील कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांकडे गौण खनीज उत्खननासंदर्भातील परवान्यांची मागणी केली. ते कंपन्यांकडे उपलब्ध नव्हते. तिन्ही ठिकाणी वापरण्यात आलेल्या गौण खनीजाचे मोजमाप करण्यात आले, त्यामध्ये 476 ब्रास वाळू, 20 हजार ब्रास मुरूम, 200 ब्रास खडी, 100 ब्रास दगड, 500 ब्रास सॅण्ड क्रश असल्याचा प्राथमिक अंदाज असून त्याचे मोजमाप उशिरापर्यंत सुरू होते. मिळालेल्या माहितीनुसार मायडिया व कॅरीअर या कंपनीच्या उभारणीचे काम सुरज बिल्डकॉन या रस्तेबांधकामातील नामांकीत कंपनीकडे असून स्थानिक ठेकेदार त्यांना गौण खनिजाचा पुरवठा करीत आहेत. मींडा कंपनीच्या उभारणीचे काम कंपनीमार्फत करण्यात येते व त्यासाठी स्थानिक पुरवठादार गौण खनिज पुरवठा करतात. गौण खनिजाच्या उत्खनासंदर्भात स्थानिक नागरीकांशी संपर्क साधला असता परिसरातील भोयरे गांगर्डा, बाबुर्डी, म्हसणे, वाघुंडे येथील डोंगर तसेच माळरानांमधील मुरूमाचा रात्रीच्या वेळी उपसा करण्यात येत होता. त्याविरोधात आवाज उठविणारांना धमकावले जात होते. त्यामुळे त्याविरोधात कोणीही आजवर तक्रारी केल्या नसल्याचे सांगण्यात आले.

गौण खनिज पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांकडून यांत्रीक उपकरणे व डंपर पळवून नेण्यात येऊ नयेत म्हणून तहसिलदार देवरे यांनी खबरदारी घेत कारवाईदरम्यान सुपे पोलीस ठाण्याचा बंदोबस्त तैनात केला. पोलिसांच्याच मदतीने वाहने ताब्यात घेण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या