
नगर अर्बन बँक 31 मार्च 2022 रोजी नफ्यात आणण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आता नगर अर्बन बँक बचाव कृती समिती थकबाकीदारांच्या दारात जाणार आहे. बँकेचे प्रशासक महेंद्रकुमार रेखी यांनी यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळेच लवकरच नगर अर्बन बँक बचाव कृती समितीचे सदस्य, बँकेचे काही कर्मचारी व काही माजी संचालक एकत्रित येऊन विशेष वसुली मोहीम हाती घेण्याची चिन्हे आहेत.
नगर अर्बन बँकेचा एनपीए वाढल्याने बँकेवर दोन वर्षांपूर्वी रिझर्व्ह बँकेने प्रशासकांची नियुक्ती केली आहे. या नियुक्तीनंतर एकीकडे बँकेच्या वसुलीला चालना दिली जात असताना बँकेच्या कर्ज वितरणात झालेला गैरव्यवहार तसेच अन्य कामकाजातील अनियमितता व गैरव्यवहारांबद्दल पोलिसांद्वारे दोषींवर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शाखेत झालेल्या 22 कोटींच्या कर्ज वितरण घोटाळ्यासह नगरच्या मुख्य शाखेत झालेल्या सुमारे 3 कोटींच्या चिल्लर घोटाळ्याप्रकरणी पोलिसांत गुन्हे दाखल झाले आहेत, तर काही दिवसांपूर्वी बँकेच्या शेवगाव शाखेतील सुमारे सव्वा पाच कोटींच्या बनावट सोने तारण कर्ज घोटाळ्याचाही गुन्हा पोलिसांत दाखल झाला असून, पोलिसांद्वारे त्याचा तपास सुरू आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर बँकेच्या वसुलीसाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज असल्याने बँकेच्या कर्मचाऱयांनीही यासाठी पुढाकार घेण्याचे ठरवले आहे. त्यांना या कामात आता नगर अर्बन बँक बचाव कृती समितीचे सदस्य व काही माजी संचालक मदतीचा हात देणार आहेत.
राजेंद्र गांधी म्हणाले, नगर अर्बन बँक वसुलीला अपेक्षित गती नाही. त्यामुळे कर्मचाऱयांसोबत घेतलेल्या बैठकीचे फलीत म्हणून बँकेच्या मॅनेजमेंट कमिटीमध्ये दोन कर्मचारी प्रतिनिधी घेण्याचा निर्णय झाला आहे. त्याला प्रशासकांनीही सकरात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे बँकेच्या वसुली कामात पारदर्शकता येण्यासह कामाला वेगदेखील येईल.
31 मार्चपर्यंत बँक नफ्यात आणण्याचा संकल्प
बँक बचाव कृती समितीच्या प्रयत्नांना हे मोठे यश आले आहे. यासोबतच बँकेच्या मोठय़ा 50 थकबाकीदारांकडे बँकेचे कर्मचारी, अधिकारी, माजी संचालक व बँक बचाव समितीचे सदस्य असे 25 ते 30 जण प्रत्यक्ष भेट देत वसुलीची कारवाई करणार आहेत. यामधून वसुलीला नक्कीच वेग येईल. प्रशासकांनी या संकल्पनेलादेखील मान्यता दिली आहे. 31 मार्च 2022ला नगर अर्बन बँकेला नफ्यात आणण्याचा संकल्प बँक बचाव समिती व कर्मचाऱयांनी केला आहे. सर्वांनी असेच सहकार्य केले तर हे उद्दिष्ट नक्कीच साध्य होईल. या सर्व प्रक्रियेत बँक बचाव समितीला काही वेळेस आक्रमक भूमिका घ्यावी लागली. काही कठोर शब्द वापरावे लागले. पण हे सर्व बँक वाचवण्याच्या हेतूनेच सुरू आहे, असेही गांधी यांनी सांगितले.
सुनावणी पुढे ढकलली
नगर अर्बन बँक बचाव कृती समितीने बँकेच्या वसुलीबाबत खंडपीठात याचिका दाखल केली होती. यावर नुकतीच सुनावणी झाली. पण, सरकारी वकिलांनी म्हणणे मांडण्यासाठी मुदत मागितल्यामुळे सुनावणी पुढे ढकलली गेली आहे, असे गांधी यांनी सांगितले.





























































