मालवण समुद्रात घुसखोरी करणाऱ्या पर्ससीन ट्रॉलरवर कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मालवण

सिंधुदुर्ग किल्ल्यानजीकच्या समुद्रात आठ वावाच्या आत घुसखोरी करत मासळीची लूट करणारे रत्नागिरीतील तीन पर्ससीनचे ट्रॉलर्स मत्स्य व पोलीस प्रशासनाने संयुक्त गस्तीनौकेद्वारे सोमवारी पकडले. ट्रॉलर्स पळून जाऊ नयेत यासाठी स्थानिक मच्छीमारही या मोहिमेत सहभागी झाले होते. हे तिन्ही ट्रॉलर्स येथील बंदरात दुपारी उशिरा आणण्यात आले. या ट्रॉलर्सवरील मासळीचा तत्काळ लिलाव करण्याच्या तसेच मासळी लिलावाच्या पाचपट दंडाच्या कारवाईचा प्रस्ताव तहसीलदारांकडे सादर करण्याच्या सूचना आमदार वैभव नाईक यांनी सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त राजकुमार महाडिक यांना दिल्या आहेत.

पकडलेल्या तिन्ही ट्रॉलर्सवर कारवाईचा निर्णय होईपर्यंत येथील बंदरात त्या ठेवण्यात येणार आहेत. या ट्रॉलर्सना मत्स्य व्यवसायाची गस्तीनौका बांधून ठेवली असून तेथे सागरी सुरक्षेचे कर्मचारी तैनात आहेत. दोन दिवसांपूर्वी पळून गेलेल्या ट्रॉलरसंदर्भात मंगळवारी तहसीलदारांकडे निवेदन दाखल केले जाणार आहे. सोमवारी सकाळीच परराज्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील हायस्पीड, पर्ससीनधारकांनी आठ वावाच्या आत घुसखोरी करत मासळीची लूट सुरू केल्याचे दिसताच पारंपरिक मच्छीमारांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे अनधिकृत मासेमारीवर कारवाईसाठी मत्स्य व पोलिस प्रशासनाने संयुक्त गस्तीनौकेद्वारे मोहिम हाती घेत रत्नागिरीतील साहिल अमर मुकादम यांच्या मालकीचा अल अमर-२, हनिफ मुल्ला यांच्या मालकीचा महमदी-२, जमीर होडेकर यांच्या मालकीचा अबेझमझम हे तीन ट्रॉलर्स पकडले. हे तिन्ही ट्रॉलर्स दुपारी येथील बंदरात आणण्यात आले. या कारवाई मोहिमेत देवगडचे मत्स्य परवाना अधिकारी प्रतीक महाडवाला, पोलीस कर्मचारी सुनील वेंगुर्लेकर, सिद्धेश चिपकर, सागरी सुरक्षा पोलिस चंद्रकांत कुबल तसेच ट्रॉलर्स पळून जाऊ नयेत यासाठी काही स्थानिक मच्छीमारही यात सहभागी झाले होते.