
सामना प्रतिनिधी । हडोळती
अहमदपूर तालुक्यात अवैध वाळू उपसा करण्यास ऊत आला असून वाळू माफीयांकडून मन्याड नदी पात्रात वाळू उपसामुळे या पात्राची चाळण होत आहे. त्यामुळे महसूल विभागाने धडक कारवाई करत वाहने ताब्यात घेतली व24 लाख दंड आकारला व या उपरही वाळू उपसा करताना आढळल्यास मोक्का अंतर्गत कारवाई केली जाणार असल्याचे तहसिलदार अरुणा संगेवार यांनी सांगितले.
मन्याड नदी पात्रातील वाळू उपसा होत असल्याची तक्रार या परिसरातील सरपंचानी केली होती. वाळू माफीयाचे धागेदोरे राजकारणातील काही नेत्यासोबत असल्याकारणाने वाळू माफीयांनी पगार देऊन खबऱ्या ठेवला होता. महसूल विभागातीलच एका खबऱ्याने महसूल विभागावर पाळत ठेवल्याने महसूल विभागाला कारवाई करण्यास अडचण येत होता. त्यामुळे तहसीलदार संगेवार यांनी खबऱ्याला पकडून पोलिसाच्या हवाली केले होते.
या कारवाईत वाळू उपसा करणारा जेसीबी चालक पसार झाला. या कारवाईत दोन ट्रक, चार हायवा, चार ट्रॅक्टर पकडण्यात आले. यात जेसीबी एका ट्रॅक्टर मालकाचा आसल्यामुळे याला जादा दंड आकरण्यात आला. या दंडाची एकूण रक्कम ही 23 लाख 74 हजार रुपये असल्याची माहिती महसूल विभागातून देण्यात आली. यातील 15 लाख 75 हजार रुपयाची रक्कम सोमवारी वसूल करण्यात आली. या कारवाईच्या दोन दिवसापूर्वी विद्यमान आमदाराच्या चुलत भावाचे ट्रॅक्टर पकडण्यात आले. यात 1 लाख 17 हजाराचा दंड वसूल करण्यात आला. कोणत्याही दबावाला बळी न पडता महसूल विभागाने केलेल्या धडक कारवाईत सर्व स्तरातून कौतूक होत आहे.



























































