
लोणी काळभोर परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या दोन सराईतांना पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. त्यांच्याविरूद्ध वेगवेगळ्या स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. गणेश शिवाजी चौधरी (वय 24, रा. कुंजीरवाडी, लोणीकाळभोर) आणि अजय शाम विश्वकर्मा (वय 20, रा. म्हातोबाची आळंदी रोड, कुंजीरवाडी ) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत.
शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सराईतांविरूद्ध तडीपार कारवाई सुरू केली आहे. त्यामध्ये सराईत गुन्हेगार, बेकायदेशीर धंदे करणारे, अंमली पदार्थ विक्रीचे रॅकेट चालविणारे, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी करणाऱ्यांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यानुसार लोणी काळभोर परिसरात दहशत माजविणाऱ्या गणेश चौधरी आणि अजय विश्वकर्मा यांच्याविरूद्ध तडीपारीचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेन्द्र मोकाशी, यांनी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांना पाठविला.
दोघांना दोन वर्षांसाठी तडीपार कारवाई करण्यात आली. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर आयुक्त नामदेव चव्हाण, उपायुक्त नम्रता पाटील, एसीपी बजरंग देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेन्द्र मोकाशी, पोलीस निरीक्षक सुभाष काळे, उपनिरीक्षक प्रियंका चौगुले, गणेश सातपुते, संदिप धनवटे यांनी केली.


























































