स्कुबा व्यावसाईकांवर कारवाईचा बडगा; मालवणात आठजणांचे स्कुबा सिलिंडर जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

समुद्रात स्कुबा डायव्हिंग व प्रवासी वाहतुकीचा परवाना नसल्याप्रकरणी बंदर विभागाने शनिवारी मालवण किनारपट्टीवर धडक कारवाई केली. यात आठ व्यावसाईकांचे स्कुबा सिलिंडर कारवाई पथकाने ताब्यात घेतले आहेत. ही कारवाई कोणताही पंचनामा न करता दडपशाहीने करण्यात आली आहे, असे सांगत स्कुबा व्यावसाईकांनी मालवण बंदर कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. मात्र, बंदर अधिकारी ताम्हणकर व महाडिक यांनी करण्यात आलेली कारवाई प्रादेशिक बंदर अधिकारी यांच्या आदेशावरून करण्यात आल्याचे स्पष्ट केले.

प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यांनी शुक्रवारी तातडीची बैठक घेत अनधिकृत स्कुबा डायव्हिंगवर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार आपल्यासह सहाय्यक बंदर अधिकारी यु. आर. महाडिक, शिपाई गावकर, कदम यांच्या पथकाने शनिवारी दिवसभर मालवण समुद्रात किल्ले सिंधुदुर्गजवळ स्कुबा पॉईंट येथे कारवाई केली. स्कुबा व प्रवासी वाहतूक परवानगी नाही, नौका नोंदणी प्रमाणपत्र नाही, सर्व्हे नाही, नौका चालक प्रमाणित नाही या कारणांखाली बंदर विभागाने कारवाई करत आठ व्यावसायिकांचे स्कुबा सिलिंडर जप्त केले. यात निखिल ढोके, अजित आचरेकर, अन्वय प्रभू, दामोदर तोडणकर, हेमंत रामाडे, जयदेव लोणे, बिल्लू आडकर, गौरव प्रभू यांच्यावर कारवाई करण्यात आली.

बंदर विभाग मनमानी पद्धतीने व अधिकारी वर्गाचे खिसे भरण्यासाठी कारवाई करत आहे. यापूर्वी अशा घटना घडल्या असून आपल्याकडे त्याचे व्हिडीओ आहेत. तरी करण्यात येणारी कारवाई अन्यायकारक व नियमबाह्य पद्धतीने व कोणताही पंचनामा ना करता करण्यात आल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. पर्यटन वाढीस पाठबळ न देता केवळ कारवाई हाच बंदर विभागाचा एककलमी कार्यक्रम आहे, असा आरेपही त्यांनी केला आहे. या विरोधात समुद्रात आंदोलन करणार असल्याचा इशारा दामोदर तोडणकर, गौरव प्रभू, अमित आडवलकर व अन्य व्यवसाईककानी दिला आहे.

सिलेंडर जप्तीबाबत कायद्यात स्पष्ट स्परूपात तरतूद नसली तरी प्रादेशिक बंदर अधिकारी यांच्या आदेशावरून कारवाई करण्यात आली आहे. त्यांना अधिकार आहेत. तसेच त्यांनी आपण आल्यांनंतर सिलेंडर सोडण्याचे आदेश दिले आहेत. तरी आपली भूमिका अधिकाऱ्यांसमोर मांडा, असे बंदर निरीक्षक ताम्हणकर व महाडिक यांनी व्यवसाईकांसमोर स्पष्ट केले. तर संस्था नोंदणी करून स्कुबा डायव्हिंग परवानगी मिळण्याबाबत नव्या कायदायत तरतूद असल्याचेही सांगितले. यावेळी संस्था वगळता व्यक्तिगत कागदपत्रे पूर्तता वेळोवेळी केल्याचे व्यावसाईकांनी स्पष्ट करत जाचक अटी लादण्यात आल्याचे सांगितले.