
मुंबईत आता क्लीन अप मार्शल संकल्पना रद्द होणार असून त्यांच्या जागी ‘उपद्रव शोधक’ (न्युसन्स डिटेक्टर)ची नेमणूक केली जाणार आहे. या उपक्रमासाठी पालिकेने राबवलेल्या निविदा प्रक्रियेला 15 कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. यातून लवकरच अंतिम कंपनीची निवड केली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. यामुळे मुंबईतून ‘क्लीन अप मार्शल’ हद्दपार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबई स्वच्छ-सुंदर राखण्यासाठी, कचरामुक्त करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवण्यात येतात. यामध्ये रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱयांवर, अस्वच्छता करणाऱयांवर कारवाई करण्यासाठी क्लीन अप मार्शलची नेमणूक करण्यात आली होती. यामध्ये रस्त्यावर थुंकल्यास 200 रुपयांचा दंडही वसूल करण्यात येत होता. गेल्या दोन वर्षांत या क्लीन अप मार्शलच्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी मास्कशिवाय फिरणाऱयांवर कारवाई करण्यात येत होती. विनामास्क आढळल्यास 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात येत होता. यामध्ये दोन वर्षांच्या कोरोना काळात 40 लाख जणांवर कारवाई करून 80 कोटींवर दंड वसूल करण्यात आला. मात्र अनेक वेळा वादाचे प्रसंग घडत असल्याने क्लीन अप मार्शलच्या कारवाईवर आक्षेप घेतला जात होता. यातच क्लीन अप मार्शलची सेवा पुरवणाऱया कंत्राटदाराची सेवा 31 मार्च रोजी संपल्याने पुन्हा मार्शलच कारवाई करणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. मात्र आता मुंबईत क्लीन अप मार्शल दिसणार नसल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
अशी होणार कार्यवाही
पालिकेच्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद दिलेल्या 15 संस्थांमधून शॉर्ट लिस्ट करण्यात आली आहे. यामध्ये अंतिम संस्थेची निवड झाल्यानंतर प्रत्येक वॉर्डसाठी 10 ते 30 ‘न्युसन्स डिटेक्टर’ची नेमणूक आवश्यकतेनुसार सहाय्यक आयुक्तांच्या माध्यमातून करण्यात येईल.
या ‘उपद्रव शोधकां’कडून रस्त्यावर थुंकणारे, अस्वच्छता करणारे, धोकादायकरीत्या वस्तू सोडून जाणाऱयांवर नजर ठेवून कारवाई करण्यात येईल.
या ‘न्युसन्स डिटेक्टर’साठी विशिष्ट ड्रेस कोडही निश्चित केला जाईल. शिवाय त्यांच्यासाठी सर्वसमावेशक नवे नावही निश्चित करण्यात येईल, असेही पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येईल.
































































