
सामना प्रतिनिधी । मुंबई
प्रसिद्ध सिने-नाटय़ कलाकार दिनेश साळवी यांचे बुधवारी आकस्मिक निधन झाले. ते 53 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे.विलेपार्ले येथे राहणारे दिनेश साळवी बुधवारी सायंकाळी मॉलमध्ये जाण्यासाठी निघाले असता भररस्त्यात त्यांच्या छातीत दुखू लागल्याने ते खाली बसले. आसपासच्या नागरिकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
साळवी यांनी नाटय़यशवंत या संस्थेच्या माध्यमातून अभिनयाला सुरुवात केली. कामगार कल्याण मंडळाच्या अनेक एकांकिका, राज्य नाटय़ स्पर्धा, व्यावसायिक रंगभूमीवर काम केले. त्यांनी जमलं बुवा एकदाचं, आप्पाजींची सेक्रेटरी, बाई रे बाई, वय वर्षे 55, बिघडले स्वर्गाचे दार, नटसम्राट, कमाल कसली धमाल या नाटकांत काम केले. तसेच काही मराठी आणि हिंदी सिनेमातही त्यांनी अभिनयाची चुणूक दाखवली. गंगूबाई नॉन मेट्रीक, अस्मिता, लक्ष्य, चाळ नावाची वाचाळ वस्ती, हृदयात वाजे समथिंग या मराठी मालिका आणि सीआयडी आणि हम पाँच या मालिकेतून ते घराघरांत पोचले. सध्या शक्ती प्रोडक्शन अँड इव्हेंटच्या माध्यमातून नवोदित कलाकारांसाठी त्यांचे उपक्रम सुरू होते. त्यांच्या निधनाने नाटय़क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कॉलेज रंगभूमीवर काम करणाऱया युवा कलावंतांना धक्का बसला आहे.



























































