आता कोणालाही ‘भिडू’ म्हणताना जरा सांभाळून…, जॅकी श्रॉफ यांची दिल्ली न्यायालयात याचिका

बॉलीवूड अभिनेता जॅकी श्रॉफ त्याच्या हटके स्टाईल आणि त्याच्या बोलण्याच्या अनोखी शैलीमुळे प्रसिद्ध आहे. त्यात त्यांचा भिडू हा शब्द सर्वांच्या लाडकीचा असून तो अलिकडे सर्रास वापरला जातो. मात्र आता हा शब्द वापरताना जरा सांभाळून वापरावा लागणार आहे. कारण आता याविरोधात जॅकी श्रॉफने उच्च न्यायालयाचाा दरवाजा ठोठावला आहे. जॅकी श्रॉफने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यात त्याने आपली ओळख आणि प्रसिद्धी हक्कांचे संरक्षण करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे जॅकी श्रॉफ यांनी त्याच्या परवानगीशिवाय त्याचे नाव, फोटो, आवाज आणि ‘भिडू’ शब्द वापरणाऱ्या संघटनांविरोधात खटला दाखल केला आहे.

याचिकेत म्हटले आहे की, सोशल मीडिया चॅनेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲप्स आणि इतर प्लॅटफॉर्मवर त्याच्या परवानगीशिवाय त्याचे नाव, आवाज, फोटो आणि त्याच्याशी संबंधित इतर गोष्टींचा वापर करू नये, असे निर्देश न्यायालयाने द्यावेत. न्यायमूर्ती संजीव नरुला यांनी या याचिकेवर न्यायालयात सुनावणी केली असून त्यासोबत त्यांनी बचाव पक्षालाही नोटीस बजावली आहे. यासोबतच या संपूर्ण प्रकरणावर बुधवारी 15 मे रोजी सुनावणी होणार असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.

जॅकी श्रॉफच्या पक्षाचे वकील प्रवीण आनंद यांनी न्यायालयाला सांगितले की, काही प्रकरणांमध्ये त्यांचे फोटो आणि आवाज आक्षेपार्ह मीममध्ये वापरले जातात, काही प्रकरणांमध्ये त्यांच्या फोटोंचाही वापर होत असल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. जॅकी श्रॉफने आपल्या याचिकेत न्यायालयाला विनंती केली आहे की, जॅकी श्रॉफ या नावाव्यतिरिक्त त्याला जॅकी, जग्गू दादा आणि भिडू असेही बोलले जाते. त्यामुळे ही सर्व नावे त्यांच्या परवानगीशिवाय कोणत्याही व्यासपीठावर वापरू नये असे त्यात म्हंटले आहे. जॅकी श्रॉफ यांनी आपल्या याचिकेत गुगलच्या मालकीच्या टेनॉर, GIF बनवणारी कंपनी Giphy, AI प्लॅटफॉर्मचा उल्लेख केला आहे. त्यांनी म्हटले आहे की त्याचा आवाज, फोटो किंवा नाव वापरल्याने त्याच्या प्रतिमेलाही हानी पोहोचली आहे.