तामिळनाडूच्या सत्तानाट्यावर पडदा; VCK आणि IUML च्या पाठिंब्यानंतर विजय यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तामिळनाडूमध्ये गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या हायव्होल्टेज राजकीय नाट्याचा अखेर शनिवारी शेवट झाला. विदुथलाई चिरुथाईगल कात्ची (VCK) आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) या पक्षांनी अभिनेता ते राजकारणी बनलेल्या जोसेफ विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे. व्हीसीकेच्या पाठिंब्याच्या पत्रानंतर विजय हे तमिळनाडूचे पुढील मुख्यमंत्री होतील, यावर टीव्हीकेचे सरचिटणीस आधाव अर्जुन यांनी शिक्कामोर्तब केला आहे. यासंर्दभात ‘आज तक’ने वृत्त दिले आहे.

हे राजकीय यश मिळवण्यापूर्वी विजय यांना मोठ्या संघर्षाला सामोरे जावे लागले. त्यांनी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची तीनदा भेट घेतली. मात्र प्रत्येक वेळी त्यांना सरकार स्थापनेसाठी नकार मिळाला. शुक्रवारी विजय यांच्याकडे १०८ जागांसह काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या (CPI आणि CPI(M)) पाठिंब्यामुळे ११६ आमदारांचे संख्याबळ होते. २३ एप्रिल रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत टीव्हीकेने १०८ जागा जिंकल्या होत्या, ज्यात विजय यांनी स्वतः निवडणूक लढवलेल्या पेरंबूर आणि तिरुचिरापल्ली पूर्व या दोन्ही मतदारसंघांचा समावेश आहे.

निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार विजय यांना एक जागा रिक्त करावी लागणार असल्याने टीव्हीकेचे संख्याबळ १०७ झाले आहे. यात काँग्रेसच्या ५ आणि सीपीआय व सीपीआय(एम) च्या प्रत्येकी २ आमदारांच्या पाठिंब्यामुळे ही संख्या ११६ वर पोहोचली होती. २३४ जागांच्या विधानसभेत बहुमतासाठी ११८ जागांची आवश्यकता आहे. व्हीसीकेने सत्तेतील वाटाघाटींनंतर शनिवारी आपला निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितले होते.

दरम्यान, सुरुवातीला टीव्हीकेकडे झुकलेली आययूएमएल शुक्रवारी डीएमके आघाडीशी एकनिष्ठ असल्याचे सांगत चर्चेतून बाहेर पडली होती. मात्र आता व्हीसीके आणि आययूएमएलच्या पाठिंब्यानंतर विजय यांच्याकडे ११८ आमदारांचे संख्याबळ झाले असून, दक्षिणेकडील या राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेला बहुमताचा आकडा त्यांनी गाठला आहे.