पाहुणा तो नाही, आम्ही आहोत! सिद्धार्थ चांदेकरच्या इमारतीच्या आवारात बिबट्या अन् हरणाचे दर्शन

मालिका-चित्रपटांमधील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याने आपल्या इमारतीच्या आवारातील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटो पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. सिद्धार्थला मंगळवारी आपल्या इमारतीच्या आवारात बिबट्या वावरताना दिसला. त्याने क्षणाचाही विलंब न लावता बिबट्याचे फोटो टिपले आहेत.

त्यानंतर काही वेळाने झाडाझुडपांतून डोकावणारे हरीणदेखील आपल्या कॅमेऱयात बंदिस्त केले आहे.

सिद्धार्थ आणि मिताली हे मराठी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रेटी जोडपे गोरेगाव पूर्वेला राहतात. त्यांच्या इमारतीच्या मागच्या बाजूला आरेचे घनदाट जंगल आहे. त्यामुळे अधूनमधून या परिसरात वन्य प्राण्यांचे दर्शन घडते. बिबटय़ाचा फोटो शेअर करत सिद्धार्थ म्हणाला, ‘‘आमच्या बिल्डिंगच्या मागे आज एक पाहुणा आला होता. बराच वेळ आमच्याकडे टक लावून बघत बसला आणि झुडपात निघून गेला. त्याच्या चेहऱयावर एक जखम दिसली. ‘तुमच्यामुळे झालंय हे’ असं नजरेतून सांगत होता. बिल्डिंगमधले सगळे फोटो काढायला खिडकीत आले. मीपण आलो. तो फक्त स्थिर नजरेनं बघत होता आमच्याकडे. त्याच्या नजरेतून कळत होतं स्पष्ट की, पाहुणा तो नाही, आम्ही आहोत. हे त्याचं घर आहे.’’ त्यानंतर सिद्धार्थने काही वेळाने झाडांतून डोकावणारे हरीण टिपले आहे. ‘‘पिंजऱयात मी होतो अडकलेलो… तो मोकळा फिरत होता सगळीकडे!’’ अशी कॅप्शन त्याने या फोटोला दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या