नकारात्मक भूमिकांचे आव्हान प्रॉमिसिंग

>> गणेश आचवल

सध्या ‘सोनी मराठी’वर ‘गुन्ह्याला माफी नाही’ ही मालिका सुरू आहे. त्यात इन्स्पेक्टर बावनकुळे ही भूमिका करणाऱ्या अभिनेत्याचे नाव आहे सुप्रित कदम… एक प्रॉमिसिंग चेहरा.

सुप्रितचे शालेय शिक्षण नाबर गुरुजी विद्यालय मराठी माध्यमात झाले. त्यानंतर बारावीपर्यंतचे शिक्षण शारदाश्रम ज्युनिअर कॉलेजमध्ये झाले. तेव्हा अल्फा महाकरंडक एकांकिका स्पर्धा होत होत्या. त्यात त्याने भाग घेतला होता. एकांकिका स्पर्धेत काम करताना अभिनयाची त्याची आवड विकसित झाली होती. पुढे मग सोमय्या कॉलेजमधून त्याने डिप्लोमा इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. त्या कॉलेजमध्येदेखील ‘टॅलेंट हंट’मध्ये त्याने गायन केले होते. सुप्रित म्हणतो, ‘‘मी नोकरीदेखील करत होतो, पण दरम्यान यूटय़ूबवरील अनेक व्हिडीओ पाहून, रंगमंचीय आविष्कार पाहून मलादेखील अभिनय क्षेत्रात करीअर करण्यासाठी प्रयत्न करावेसे वाटू लागले होते.’’

पुढे मग सुप्रितचे विविध मालिकांसाठी ऑडिशन देणे सुरू झाले. पुढे मग काही मालिकांत छोटय़ा भूमिका केल्यानंतर त्याला ‘गणपती बाप्पा मोरया’ या मालिकेत ब्रह्मदेवाची भूमिका मिळाली. ‘नकळत सारे घडले’, ‘लग्नाची बेडी’, ‘गुरुदेव दत्त’, ‘जय जय स्वामी समर्थ’ अशा मालिकेत सुप्रितने भूमिका केल्या. ‘लग्नाची बेडी’मध्ये त्याने सकारात्मक भूमिका साकारली. सध्या सुरू असलेल्या ‘गुह्याला माफी नाही’ या मालिकेतील भूमिकेविषयी सुप्रित म्हणतो, ‘‘मुळात पोलीस अधिकाऱयाची भूमिका करणे आव्हानात्मक आहे. या भूमिकेसाठी मला माझा मित्र आणि या मालिकेतील प्रमुख भूमिका करणारा अभिनेता हरीश दुधाडे तसेच दिग्दर्शक अमेय मोरे यांनी खूप सहकार्य केले. पोलिसांचा पोशाख परिधान केल्यावर एक अभिनेता म्हणून आपली जबाबदारी वाढत असते. यात मी साकारत असलेली ‘बावनकुळे’ ही व्यक्तिरेखासुद्धा नकारात्मकतेकडे जाणारी आहे. माझ्या करीअरमध्ये मी अनेक नकारात्मक भूमिका केल्या आहेत. मालिकेचा प्रेक्षकवर्ग आणि सहकलाकार जेव्हा आपल्याला त्याबद्दल अभिप्राय देतात त्यावेळी खूप आनंद होतो.’’

सध्या सुप्रित ‘काव्यांजली’ या मालिकेतदेखील भूमिका करत आहे. अभिनयाप्रमाणेच त्याला क्रिकेट खेळण्याची खूप आवड आहे.