अभिनेत्री किम शर्माची मोलकरणीला मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूडपासून सध्या दूर असलेली अभिनेत्री किम शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण ही चर्चा तिच्या चित्रपटांची नसून तिने मोलकरणीला केलेल्या मारहाणीची आहे. कपडे धुताना रंगीत कपड्याचे डाग किमच्या ७० हजाराच्या पांढऱ्या शुभ्र कपड्यांना लागले. यामुळे किमने इस्थेर खेस (३१) या मोलकरणीला मारहाण केली व पगार न देता कामावरून काढले. यामुळे इस्थरने पोलिसात धाव घेतली असून पोलिसांनी किमविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना मे महिन्यातील आहे. इस्थर किमच्या खार येथील घरी २७ एप्रिलपासून काम करत होती. २१ मे रोजी कपडे धुताना ती रंगीत कपडे व पांढरे कपडे वेगळे करण्यास विसरली. तिने ते कपडे वॉंशिंग मशीनमध्ये एकत्रच धुतले. यामुळे किमच्या महागड्या पांढऱ्या शुभ्र कपड्यांवर रंगीत कपडयांचा रंग लागला. यामुळे घाबरलेल्या इस्थरने किमला ही गोष्ट सांगितली. कपडे खराब झाल्याचे बघून किमचा पारा चढला. तिने इस्थरला शिवीगाळ करत पुन्हा कामावर न येण्याचे बजावत घरातून हाकलले. त्यानंतर काही दिवसांनी इस्थर किमकडे राहिलेला पगार घेण्यासाठी गेली. मात्र किमने तिला पगार मिळणार नाही सांगत हाकलून लावले.

यामुळे इस्थरने २७ जून रोजी सांताक्रूज पोलीस ठाण्यात किमविरोधात तक्रार नोंदवली. पोलिसांनी किमवर अदखपात्र गुन्हा नोंदवला असून हे प्रकरण न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, मोलकरणीला मारहाण केलेली नाही असा दावा किमने केला आहे. तसेच तिला पगार दिल्याचेही तिचे म्हणणे आहे.