अदानी समूहाने जीव्हीकेला कोर्टात खेचले

728

आफ्रिका येथील बीडवेस्ट कंपनीने मुंबई विमानतळात गुंतविलेला आपला साडेतेरा टक्के हिस्सा अदानी समूहाला विकण्याचा निर्णय घेतला आहे. अदानी समूह आणि बीडवेस्टमध्ये त्या दृष्टीने खरेदी-विक्रीची प्रक्रियाही सुरू झाली आहे. परंतु या प्रक्रियेत जीव्हीकेकडून खोडा घालण्यात येत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या अदानी समूहाने थेट जीव्हीके संचालित मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडचे शेअरहोल्डर्स आणि नागरी विमानोड्डाण मंत्रालयाला मुंबई उच्च न्यायालयात खेचले आहे. या व्यवहाराला मंजुरी देण्याचे शेअरहोल्डर्स आणि नागरी विमानोड्डाण मंत्रालयाला आदेश देण्यात यावेत, अशी विनंतीही अदानी समूहाने न्यायालयात केली आहे.

मुंबई विमानतळात बीड सर्व्हिसेस डिव्हिजन मॉरिशस या बीडवेस्ट कंपनीची 13.5 टक्के भागीदारी आहे, तर एअरपोर्ट कंपनी ऑफ साऊथ आफ्रिकाचे (एसीएसए ग्लोबल) 10 टक्के शेअर्स आहेत. याव्यतिरिक्त एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियाची 26 टक्के आणि जीव्हीके एअरपोर्ट होल्डिंगची 50.5 टक्के भागीदारी आहे.

बीडवेस्टने आपला 13.5 टक्के हिस्सा अदानी समूहाला विकण्याचे ठरविले आहे. 1 हजार 248 कोटी किंवा 77 रुपये प्रत्येक शेअर अशी त्यासाठीची एकूण किंमत निश्चित केली आहे. याव्यतिरिक्त अदानीचे एसीएसएलादेखील एवढ्याच किमतीत त्याचा हिस्सा खरेदी करण्याची ऑफर दिली आहे. बीडवेस्टशी अदानी समूहाने खरेदी-विक्रीचा करारदेखील केलेला आहे. परंतु जीव्हीकेचा या व्यवहाराला विरोध आहे. त्यामुळेच अदानी समूहाने हायकोर्टात धाव घेतली आहे.

बीडवेस्टसोबत या खरेदी-विक्रीचा 5 मार्च 2019 रोजी करण्यात आलेला करार वैध आणि बंधनकारक असतानादेखील जीव्हीकेकडून त्यात खोडा घातला जात असल्याचा अदानी समूहाचा आरोप आहे.

आपली प्रतिक्रिया द्या