
अंमलबजावणी संचालनालया (ईडी) चे माजी उपसंचालक सचिन सावंत यांच्या घरावर ईडीच्या पथकाने छापा टाकला आहे. यामध्ये ईडीने घरातून महागडय़ा वस्तू हस्तगत केल्या असून बँक खात्यात सवा कोटी रुपयांची रक्कम आढळली आहे. 500 कोटींच्या आर्थिक अफरातफर प्रकरणात सावंत यांना अटक करण्यात आली आहे.
ईडीने केलेल्या तपासात सचिन सावंत यांचे वडील, भाऊ आणि नातेवाईक असलेल्या बोगस कंपन्यांच्या नावाने बँक खातीदेखील आढळले आहेत. तसेच याच बोगस कंपन्यांच्या नावाने त्यांनी मालमत्ता विकत घेतल्याचेही समोर आले आहे. प्रत्यक्षदर्शी कर्ज काढून मालमत्ता घेतल्याचे दाखवले असले तरी त्या कर्जाची परतफेड रोख रकमेने केली आहे. तसेच त्यांचा राहता फ्लॅटही बोगस कंपनीच्या नावे असल्याचे ईडीने स्पष्ट केले आहे. सचिन सावंत हे आयआरएस अधिकारी असून ते सध्या लखनौमध्ये जीएसटी विभागात कार्यरत आहेत.
5 जुलैपर्यंत ईडी कोठडी
सचिन सावंत यांना बुधवारी विशेष पीएमएलए न्यायालयापुढे हजर केले होते. विशेष न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी त्यांना 5 जुलैपर्यंत ईडी कोठडी सुनावली. सावंत हे यापूर्वी ईडीच्या मुंबई झोन कार्यालयात उपसंचालक म्हणून कार्यरत होते. 500 कोटी रुपये बेकायदेशीररीत्या वळवल्याच्या गुह्यातील आरोपीने सावंत यांच्याविरोधात तक्रार केली. त्यावरून सीबीआयने एफआयआर दाखल केला.





























































