यंदा शिक्षक अतिरिक्त होणार नाहीत, संचमान्यतेला स्थगिती

208
teacher-1
प्रातिनिधिक

सप्टेंबरअखेरीस होणाऱया 2019-20च्या संचमान्यतेला शालेय शिक्षण विभागने स्थगिती दिली आहे. त्यामुळे विद्यार्थी संख्येअभावी अतिरिक्त होण्यापासून यंदा शिक्षकांची सुटका झाली आहे.

दरवर्षी संचमान्यतेनंतर अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांची संख्या वाढत आहे. या शिक्षकांचे इतर शाळांत समायोजन होत नसल्याने अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. यात आणखी भर नको म्हणून यंदाची संचमान्यता न करण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने जारी केल्या आहेत. वर्ष 2018-19च्या संचमान्यतेनुसार यापूर्वी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतरच राज्यातील शाळांची 2020-21ची संचमान्यता करण्यात यावी, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले. अनेक शिक्षक संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

संस्था चालकांनो, विद्यार्थी संख्या वाढवा!
शिक्षकांची पदे मंजुरीसाठी आवश्यक असणाऱया विद्यार्थी संख्येअभावी अनेक शाळांमधील शिक्षक अतिरिक्त होत आहेत. मराठीसह अन्य प्रादेशिक भाषांमधील शाळांचा यात समावेश आहे. त्यामुळे अशा शाळांना शिक्षण विभागाने विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. संस्था चालकांना विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी एक संधी देण्याच्या उद्देशाने यंदा संचमान्यता होणार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या