आधार, पॅनकार्ड जन्मतारखेचे वैध पुरावे नाहीत; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आधारकार्ड व पॅनकार्डवरील जन्मतारखेवरून वय ठरवता येणार नाही. आधार आणि पॅनकार्ड जन्मतारखेचे वैध पुरावे नाहीत. वय ठरवण्यासाठी शाळेच्या दाखल्यावरील जन्मतारीख ग्राह्य धरली जाऊ शकते, असा महत्त्वपूर्ण निकाल उत्तर प्रदेशातील अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. जर शाळेच्या दाखल्यावरील तारखेवर आक्षेप असेल तर स्थानिक पंचायतीचा दाखला मान्य केला जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.

मेरठमधील एका प्रकरणात न्यायालयाने हा निकाल दिला. लग्न केलेल्या तरुणीच्या घरच्यांनी मुलाकडील कुटुंबीयांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यानंतर मुलीच्या वयाचा मुद्दा उपस्थित झाला. त्यावरील सुनावणीदरम्यान अलाहाबाद उच्च न्यायालयाने आधार व पॅनकार्डच्या वैधतेबाबत महत्त्वपूर्ण मत नोंदवले. आधारकार्ड आणि पॅनकार्डमधील जन्मतारखेनुसार आम्ही दोघेही प्रौढ आहोत. त्यामुळे आमच्या लग्नामध्ये हस्तक्षेप करण्यापासून घरच्यांना रोखा, असा दावा याचिकाकर्त्या तरुणीने केला होता. आधार, पॅनकार्ड आणि वैद्यकीय अहवालातील जन्मतारीख भिन्न असताना शाळेचा दाखला आणि तरुणीच्या आईच्या म्हणण्यावर अविश्वास दाखवू शकत नाही, असे स्पष्ट करीत न्यायालयाने तरुणीची याचिका फेटाळून लावली.

जन्मतारीख निश्चित करण्यासाठी जर शाळेचे प्रमाणपत्र उपलब्ध असेल तर आधारकार्ड, पॅनकार्ड आणि वैद्यकीय अहवालावर विचार करण्याचा प्रश्नच उरत नाही. जर शाळेच्या प्रमाणपत्राच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केला जात असेल तर स्थानिक पंचायतीचा दाखला मान्य केला जाईल. हा दाखलाही नसेल तर वैद्यकीय अहवालाला परवानगी दिली जाऊ शकते. – अलाहाबाद उच्च न्यायालय