नगरमध्ये ‘आदित्य संवाद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद, श्रीरामपुरात दणदणीत मेळावा

45

सामना प्रतिनिधी, नगर

बेरोजगारी, शिष्यवृत्ती, नोकरी, उद्योग-व्यवसाय, अपंगांचे प्रश्न, प्लॅस्टिकबंदी, गड-किल्ल्यांचे संवर्धन, शेतकरी आत्महत्या, विद्यार्थ्यांचे प्रश्न ते अगदी दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठीच्या योजना…. विविध प्रश्न आणि त्यावर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची ठोस आणि समर्पक उत्तरे यातून येथील ‘आदित्य संवाद’ चांगलाच रंगला. आपल्याला नवा महाराष्ट्र उभा करायचा आहे. राज्यात सर्वत्र ठिबक सिंचन योजना राबवायची आहे. महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी तुमची साथ, आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहू द्या. तुम्हाला जी वचने दिली आहेत ती नक्की पूर्ण करू अशी ग्वाही शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी देताच उपस्थितांनी टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटाने प्रतिसाद दिला. शिर्डीतील साईदर्शनाने जनआशीर्वाद यात्रेच्या पहिल्या टप्प्याची सांगता झाली.

आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा नगर जिह्यातील आज दुसरा दिवस होता. विविध ठिकाणी समाजातील विविध घटकांशी साधलेला संवाद, विशेषतः तरुणाईच्या प्रश्नांची घेतलेली दखल, श्रीरामपुरातील मेळाव्याला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे सर्वत्र भगवेमय वातावरण झाले होते. नगर शहरातील माऊली सभागृहात सकाळी ‘आदित्य संवाद’चा कार्यक्रम रंगला. यावेळी राधाबाई काळे, विखे-पाटील कॉलेज, न्यू आर्टस्, कॉमर्स यांसह विविध शाळांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या. सुरुवातीला आलेल्या लेखी प्रश्नांनी ‘संवाद’ला प्रारंभ झाला.

प्लॅस्टिकबंदीचा सर्वत्र गौरव होत आहे. त्याचप्रमाणे गड-किल्ल्यांचे संवर्धन कशा पद्धतीने करणार, असा प्रश्न ऋषिकेश काकडे याने उपस्थित केला. यावर आदित्य ठाकरे म्हणाले, देशात प्लॅस्टिकबंदीचा सरकार निर्णय घेईल, पण अजूनही काही ठिकाणी प्लॅस्टिक पाहायला मिळत आहे. जनावरांच्या पोटातून प्लॅस्टिक मिळत आहे याचा सर्वांनी विचार करायला पाहिजे. हे घातक असून आपण स्वतःहून प्लॅस्टिकचा वापर बंद केला पाहिजे. गड-किल्ले पुरातत्त्व खात्याकडे आहेत. अनेक ठिकाणी त्यांची अवस्था बिकट झाली आहे. त्याची दुरुस्ती करून किल्ल्यांचे संवर्धन करून रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो. ते आम्ही आता करणार आहोत असे त्यांनी सांगितले.

जनतेचे प्रश्न सोडविणे हेच ध्येय!
नगर – जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱयात फिरून जनतेचे प्रश्न आणि अडचणी समजून घेत आहे. त्यांचे प्रश्न सोडविणे हेच ध्येय आहे. मुख्यमंत्रीपदाचा विषय माझ्यासाठी महत्त्वाचा नाही. मी महाराष्ट्र घडवायला निघालो आहे. जे लोक माझ्या मुख्यमंत्रीपदाबाबत बोलत आहेत त्यांचे माझ्यावर प्रेम असल्याने बोलत असतील असे शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितले. नगर शहरातील माऊली सभागृहात झालेल्या संवाद कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी आदित्य ठाकरे बोलत होते. विरोधी पक्षाने ‘जनआशीर्वाद यात्रे’वर टीका केली आहे. त्यावर मी सर्वत्र आक्रोश बघत आहे. आम्हाला जनतेचा आशीर्वाद मिळत आहे ते आमच्यासाठी पुरेसे आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

खोटे बोलू नका, नाटक करू नका
राजकारणाचे धडे तुम्ही काकांकडून घेतले का, असे एका विद्यार्थिनीने विचारल्यावर आदित्य ठाकरे यांनी हजरजबाबीपणे दिलेल्या उत्तराला उपस्थितांनी टाळय़ांच्या कडकडाटाने दाद दिली. आदित्य ठाकरे म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून पहिला धडा घेतला तो म्हणजे 100 टक्के विचार करून बोला. बाण सुटल्यावर पुन्हा येत नाही अशी त्यांची शिकवण होती, तर दुसरा धडा माझे वडील उद्धव ठाकरे यांच्याकडून घेतला तो म्हणजे प्रामाणिक राहा, लोकांचे प्रश्न सोडवा, खोटे बोलू नका, नाटक करू नका. असे म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

मंत्रालयात जाण्याची गरज नाही
62 वर्षांच्या निवृत्त झालेल्या शिक्षिकेने पेन्शनची व्यथा आदित्य ठाकरे यांच्यापुढे मांडली. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी तुमचा जो प्रश्न आहे त्यासंदर्भात आजच संबंधित मंत्र्यांशी बोलतो, तुम्हाला मंत्रालयात येण्याची गरज नाही असे सांगताच टाळय़ांचा कडकडाट झाला.

आपली प्रतिक्रिया द्या