
आमदार आदित्य ठाकरे यांनी पर्यावरण व पर्यटनमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर या विभागाच्या माहितीसाठी आढावा बैठका सुरू केल्या आहेत. आदित्य ठाकरे यांची प्रत्येक विषय समजून घेण्याची क्षमता, त्यावर त्यांच्याकडून केले जाणारे मार्गदर्शन आणि त्यांची निर्णयक्षमता पाहून संबंधित विभागाचे आयएएस अधिकारीही अवाक झाले आहेत. शनिवारी या विभागांच्या घेतलेल्या आढावा बैठकीत त्यांनी केलेले मार्गदर्शनावर आयएएस अधिकारीही फिदा झाले.
आदित्य ठाकरेंकडे पर्यावरण खाते आहे. या खात्याची शुक्रवारी त्यांनी सह्याद्री अतिथीगृहात आढावा बैठक घेतली. मिठी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठीच्या उपाययोजना, माहुलमधील प्रदूषण आणि तेथील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न, या प्रत्येक बाबीची आदित्य ठाकरे यांनी माहिती घेतली. या वेळी आदित्य ठाकरे यांनी अधिकाऱ्यांकडून खात्यातील विविध विषय समजून घेतले. पण दुसऱ्या बाजूला त्यांनी अधिकाऱ्यांनाही विविध समस्यांविषयी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे उल्हास नदी, कोल्हापूरची पंचगंगा अशा अनेक नद्यांच्या प्रदूषण निवरणासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना, प्लॅस्टिकबंदीबरोबरच त्याच्या उत्पादकांसोबत बैठक घेऊन त्यांच्याशीही चर्चा करायला हवी. केंद्र सरकारकडे महाराष्ट्र सरकारने विविध प्रस्ताव पाठवले आहेत. या प्रस्तावांचा पाठपुरावा करून ते विषय मार्गी लावण्यात यावेत, अशा अनेक सूचना आदित्य ठाकरे यांनी केल्या.
पर्यावरण विषयातील आदित्य ठाकरे यांचे ज्ञान आणि याविषयी मार्ग सुचवितानाच दाखविलेली निर्णय क्षमता यामुळे बैठकीला उपस्थित आयएएस अधिकारीही अवाक झाले. या वेळी पर्यावरण खात्याचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष सुधीर श्रीवास्तव व सदस्य सचिव ई. रवींद्रन हे तीन आयएएस अधिकारी उपस्थित होते. याशिवाय अन्यही अधिकारी उपस्थित होते.


























































