
तुमच्यावर माझा विशेष लोभ होता हे तुम्हालाही माहिती आहे. पण तुम्ही असे कराल असे मला वाटले नव्हते अशा शब्दात शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी आज बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे यांच्याकडे स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली.
विधान भवनाच्या परिसरात आदित्य ठाकरे व प्रकाश सुर्वे समोरासमोर आले तेव्हा त्यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली. प्रकाश सुर्वे समोर दिसताच ‘आपण काय सांगणार मतदारांना’ असा सवाल केला. त्या दिवशी तुम्ही आमच्याकडे येणार म्हणून जेवण तयार ठेवले होते. मी येत होतो. पण तुम्ही असे कराल अशी खरंच माझी अपेक्षा नव्हती. मला स्वतःलाही दुखः झाले आहे हे तुम्हालाही माहिती आहे. ठिक आहे. आता परत विचार करा असे सांगून आदित्य ठाकरे पुढे गेले. पण प्रकाश सुर्वे त्यांच्या नजरेला नजर भिडवू शकले नाही.
मामा लांडेंकडेही नाराजी
अधिवेशाच्या पहिल्या दिवशीही आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदार दिलीप लांडे यांच्याकडे अशाच शब्दात उघड नाराजी उघड केली. रविवारी सभागृहाचे कामकाज संपताच सर्व आमदार बाहेर निघाले तेव्हा आदित्य ठाकरे आणि दिलीप लांडे नेमके लॉबीमध्ये समोर आले तेव्हा ‘मामा’ तुमच्याकडून माझी ही अपेक्षा नव्हती’ अशा शब्दात थेट समोरच नाराजी व्यक्त केली. दिलीप लांडे यांनी एकही शब्द न उच्चारता काढता पाय घेतला.




























































