शिवसेनाप्रमुखांचा कानमंत्र हाच येणाऱ्या शिवशाहीच्या सरकारचे ब्रीदवाक्य असेल!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नाशिक

“हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेले 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हे वाक्य हे ब्रीवाक्य आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात घेऊन चाललो आहोत. हेच ब्रीदवाक्य येणाऱ्या शिवशाहीचे जे सरकार असेल त्यांचे ब्रीदवाक्य असेल” असे शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले. आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा आज त्र्यंबकेश्वर इथे पोहोचली. यावेळी त्यांनी शिवसैनिकांना आणि सामान्य नागरिकांना उद्देशून भाषण केले. या भाषणामध्ये त्यांनी जनतेला डोळ्यासमोर ठेवूनच शिवसेना काम करत आली आहे आणि यापुढेही करत राहील असं आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

 

जनतेला दिलेली वचने आमच्यासाठी महत्वाची

आदित्य ठाकरे यांनी केलेल्या भाषणात म्हटले की ‘निवडणुका झाल्यानंतर काही पक्ष मतदारांना विसरून जातात मात्र शिवसेना तसा पक्ष नाही. दोन निवडणुकांच्या मधल्या काळ हा शिवसेनेसाठी महत्वाचा असतो. सत्तेत असो अथवा नसो आम्हाला जनता आणि त्यांना दिलेली वचने महत्वाची असतात. निवडणुकीत ज्यांनी  शिवसेनेला मतदान केले त्यांचे आभार मानायला आणि ज्यांनी मतदान केले नाही त्यांची मने जिंकायला आले असल्याचं आदित्य ठाकरे यांनी या सभेत सांगितले. “शिवसेनेचे काम ज्यांनी पाहिलेले नाही, प्रेम पाहिलेले नाही तीच लोकं मतदान करत नाही. अशा लोकांना उद्देशून आदित्य ठाकरे म्हणाले की ‘तुम्ही कोणत्याही जाती, धर्माचे प्रांताचे, पक्षाचे असाल तुम्हाला कधीही मदतीसाठी हाक मारा शिवसैनिक तुमच्या मदतीसाठी धावून येईल.तेव्हा तुम्हाला कळेल की शिवसेना काय आहे.’

आदित्य ठाकरे यांचे भाषण सुरू असतानाच एका सीताराम भोये नावाच्या ग्रामस्थाने मध्येच त्यांच्या भागासाठी दवाखाना पाहिजे अशी मागणी केली. आदित्य ठाकरे यांनी त्यांचं भाषण थांबवून त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं आणि मागणी निवेदनाच्या स्वरुपात लिहून देण्याची विनंती केली. ‘हे काम लगेच करून घेऊ’ असं म्हणत त्यांना भोये यांना तत्काळ दिलासाही दिला. शिवसेना जे बोलते के करून दाखवतेच हे उपस्थितांना ठावूक असल्याने त्यावेळी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.