
सामना ऑनलाईन । मुंबई
देशाचे व राज्याचे व्यापक हित लक्षात घेऊन शिवसेनेने भाजपसोबत युती केली आहे. सत्तेसाठी शिवसेनेने युती केली नाही, असे प्रतिपादन शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकारांशी बोलताना केले.
मुंबईत नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण केंद्रात आयोजित केलेल्या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आरोग्यवर्धिनी केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदित्य ठाकरे प्रसिद्धींमाध्यमांशी बोलत होते.
टेन्शन गेले
आरोग्यवर्धिनी केंद्राच्या लोकार्पण सोहळय़ात सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांमध्ये ताणतणाव, रक्तदाब वाढत असल्याचे काही वक्त्यांनी सांगितले होते. त्याचा धागा पकडून लोकार्पण सोहळय़ात आदित्य ठाकरे म्हणाले की, शिवसेना-भाजप युती झाल्यामुळे अनेकांचे टेन्शन गेले आहे तर काही लोकांचे टेन्शन वाढले आहे. त्यावर सभागृहात एकच हशा उसळला.
नाणार–शेतकऱ्यांच्या मुद्दय़ावर युती
शिवसेना-भाजप युतीबाबत प्रसिद्धीमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, नाणार प्रकल्प, शेतकरी व मालमत्ता करात माफ करण्याच्या आमच्या मागण्या मान्य झाल्यामुळे युती केली आहे. ही युती आम्ही सत्तेसाठी केली नाही तर व्यापक राष्ट्रहित लक्षात घेऊन ही युती केली आहे. हिंदुत्वासाठी युती केल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
राज्यातल्या 151 आरोग्यवर्धिनी केंद्रांचे लोकार्पण
राज्यातल्या 151 आरोग्य उपकेंद्रांचे व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रात रूपांतर करण्यात आले आहे. पुढील वर्षीच्या मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यात सहा हजार आरोग्यवर्धिनी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. या आरोग्यवर्धिनी केंद्रांमुळे प्रसूतीपूर्व, प्रसूतीसेवा, नवजात अर्भक व नवजात बालकांना सेवांपासून आयुर्वेद योग अशा विविध 13 प्रकारच्या आरोग्य सेवा रुग्णांना मिळणार आहेत. कार्यक्रमात आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, वस्त्राsद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर आदी उपस्थित होते.
कोकण-रायगडमध्ये बोट ऍम्ब्युलन्स
राज्याच्या आरोग्य विभागाने नंदुरबारमध्ये बोट ऍम्ब्युलन्स सुरू केली आहे. त्याच धर्तीवर रायगड-कोकणामध्ये बोट ऍम्ब्युलन्स सुरू करण्याची सूचना आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली. त्यामध्ये शस्त्रक्रिया करण्याची सुविधाही उपलब्ध करा अशीही सूचना त्यांनी केली. त्यामुळे अलिबाग-उरणमधील लोकांना फायदा होईल असे ते म्हणाले. दरम्यान 108 ऍम्ब्युलन्स सेवेसाठी ऍप विकसित करण्याचा आदित्य ठाकरे यांची सूचना आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ मान्य केली.
चालू आर्थिक वर्षात राज्यातल्या 1011 आरोग्य उपकेंद्राचे, ग्रामीण भागातील 479 व शहरी भागातील 125 प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रात रूपांतर करण्यात येणार आहे.



























































