येणारं अधिवेशन खोके सरकारचं शेवटचं अधिवेशन असणार, महाराष्ट्रात परिवर्तन होणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधानसभेचं येतं हिवाळी अधिवेशन हे खोके सरकारचं शेवटचं अधिवेशन असणार आहे. 2024मध्ये केंद्रात आणि राज्यात परिवर्तन घडवणारच असा वज्रनिर्धार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. चिपळूण येथे झालेल्या खळा बैठकीनंतरच्या सभेत ते उपस्थितांना संबोधित करत होते.

चिपळूण येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार भास्कर जाधव ह्यांच्या खळ्यात झालेल्या बैठकीत आदित्य ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. त्यावेळी त्यांनी खळा बैठक घेण्यामागील प्रयोजनही सांगितलं. ते म्हणाले की, आज आपल्या दोन मतदारसंघाचे पदाधिकारी जमले आहेत. कालपासून आपल्या खळाबैठका सुरू आहेत. मूळ गोष्ट अशी की घरगुती बैठक जशी आपल्या अंगणात होते, तशी ही बैठक अंगणात घ्यायची होते. निवडणुकीची धावपळ सुरू होते, तेव्हा मोठ्या सभा होत असतात. हॉलमध्ये कार्यक्रम होत असतात. पण मला माझ्या साथीदारांशी, पदाधिकाऱ्यांशी बोलायचं होतं, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी संवाद साधला.

यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि शिवसैनिकांना त्यांना आपला निर्धारही बोलून दाखवला. आदित्य ठाकरे म्हणाले की, हे जे अधिवेशन असणार आहे, आपण सगळे त्याला सामोरे जाणार आहोत. तुम्ही लिहून घ्या हे खोके सरकारचं शेवटचं अधिवेशन असणार आहे. विरोधी पक्ष म्हणून आपलं शेवटचं अधिवेशन असणार आहे. आणि 2024 मध्ये केंद्रात आणि राज्यात आपण परिवर्तन घडवणार म्हणजे घडवणारच. ही शपथ आपण घेऊन बाहेर पडणार आहोत, असा निर्धार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.