आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याने पदवीधर तरुणांमध्ये नवचैतन्याचे वातावरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । चिपळून

कोकणात नुकताच झालेला शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या दौऱयामुळे संपूर्ण कोकणातील तरुणांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आदित्य ठाकरे यांच्या सडेतोड भाषणामुळे पदवीधर तरुणांमध्ये नवीन आशा पल्लवित झाल्या.

२५ जून रोजी कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत शिवसेनेने ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांना उमेदवारी दिली आहे. पदवीधर मतदारसंघात प्रचारासाठी गुरुवारी शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी कोकणात झंझावाती दौरा केला. या दौऱयात आदित्य ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्हय़ातील कुडाळ आणि रत्नागिरी जिल्हय़ातील चिपळूण व रत्नागिरी येथे पदवीधर मतदारांच्या आयोजित मेळाव्यात पदवीधरांशी संपर्क साधला. पदवीधरांच्या प्रश्नावर शिवसेना आणि युवासेना सातत्याने आवाज उठवितच आहे. पण यापुढे हा आवाज बुलंद करण्यासाठीच मी आपल्या भेटीसाठी आलो आहे, असे सांगून कोकण पदवीधर मतदारसंघात संजय मोरे यांना विजयी करून भगवा फडकावयाचा आहे, असेही आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले. आदित्य ठाकरे यांच्या या दौऱयाला सिंधुदुर्ग – रत्नागिरीतील पदवीधर तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती. पदवीधर तरुणांच्या समस्या सोडविण्यासाठी आपणास एक कणखर नेतृत्व मिळाले अशीच या तरुणांमध्ये भावना दिसत होती. आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्यामुळे कोकणातील तरुणांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झालेच, पण त्याचबरोबर नवीन आशाही पल्लवित झाल्या.