
महाबळेश्वर शहराची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या वेण्णा नदीवरील बायपास पुलाच्या कामाबाबत दैनिक ‘सामना’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. नदीपात्रात टाकलेल्या शेकडो टन मातीमुळे पर्यावरणासह वेण्णा नदीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. या वृत्तानंतर सार्वजनिक बांधकाम खाते खडबडून जागे झाले असून, आजपासून नदीपात्रातील माती काढण्याच्या कामासह, बंद पडलेले पुलाचे कामही पुन्हा जोमाने सुरू करण्यात आले आहे.
महाबळेश्वर शहर आणि परिसरातील पर्यटकांची वाढती संख्या पाहता, वाहतूककोंडी ही एक मोठी समस्या बनली आहे. ही कोंडी सोडवण्यासाठी स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून वेण्णा नदीच्या सांडव्याखाली बायपास पूल बांधण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती. निधीअभावी हे काम दीर्घकाळ रखडले होते. मात्र, मागील वर्षी या कामासाठी आवश्यक निधी मंजूर झाला आणि पुलाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली.
पुलाचे बांधकाम आणि रस्ता तयार करताना डोंगराच्या कडेला मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात आले. यातून निघालेली शेकडो टन माती पुनर्वापरासाठी लागणार असल्याने, संबंधित ठेकेदाराने सोयीसाठी ती जवळच असलेल्या वेण्णा नदीच्या पात्रात टाकली होती. मात्र, ही माती नदीपात्रात साचल्याने पाण्याचा नैसर्गिक प्रवाह धोक्यात आला होता. पावसाळा तोंडावर असल्याने ही माती वाहून शेतात जाण्याची भीती निर्माण झाली होती, ज्यामुळे या भागातील शेतकरी मोठ्या चिंतेत होते.
या गंभीर विषयाकडे शेतकरी नेते शरद बावळेकर यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले होते. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आंदोलनाचा इशारा दिला होता. नदीपात्राचे अस्तित्व धोक्यात आल्याने भविष्यात मोठी आपत्ती ओढवू शकते, असा इशारा त्यांनी दिला होता. या संपूर्ण प्रकरणावर दैनिक ‘सामना’ने वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाच्या डोळ्यांत अंजन घातले.
वृत्त प्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेतली. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने नदीपात्र मोकळे करणे तांत्रिकदृष्टय़ा गरजेचे होते. त्याप्रमाणे आज प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असून, पात्रातील माती उचलण्यासाठी यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मागील काही दिवसांपासून संथ गतीने चाललेले किंवा बंद पडलेले पुलाचे कामही आता वेगाने सुरू झाले आहे.
नदीपात्रातील माती काढण्यास सुरुवात झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका आता टळणार असून, बायपास पुलाचे काम मार्गी लागल्यास महाबळेश्वरच्या वाहतूककोंडीतूनही नागरिकांची मुक्तता होणार आहे.


























































