अॅड. रियाज पठाण हत्याकांडात तिघांची साक्ष नोंदविली; पुढील सुनावणी 8 ऑगस्टला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नेवासा येथील बहुचर्चित ऍड. रियाज पठाण हत्याकांडप्रकरणी नगर येथील न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. मंगळवारी सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांनी तीन साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या.

अण्णा लष्करे खून प्रकरणात आरोपींच्या बाजूने साक्ष दिल्याच्या कारणातून 16 सप्टेंबर 2013 रोजी नेवासा तहसील कार्यालयाच्या आवारात ऍड. रियाज जमशेद पठाण यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी जवळपास 13 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील काही आरोपींना जामीन मिळाला असला तरी बहुतांश आरोपी अद्यापि कोठडीत आहेत. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश नाईकवाडी यांच्यासमोर सुरू झाली आहे. मंगळवारी सरकार पक्षातर्फे ऍड. उज्ज्वल निकम यांनी नेवासा येथील एक डॉक्टर, पोस्टमार्टेम करणारे डॉक्टर व आणखी एका साक्षीदाराची साक्ष नोंदवली. पुढील सुनावणी 8 ऑगस्टला आहे.

दरम्यान, सुनावणीवेळी आरोपींना विशेष पोलीस बंदोबस्तात न्यायालयात आणले होते. ऍड. पठाण हत्याकांडप्रकरणी सुनावणी सुरू झाली असून, ती प्राथमिक टप्प्यात आहे. तीन साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्याचे ऍड. उज्ज्वल निकम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. ऍड. निकम यांना ऍड. परिमल फळे यांनी साहाय्य केले.