
रशिया-युक्रेन युद्धाला अडीच वर्षे लोटली आहेत. या काळात रशियन सैन्यावर भाडोत्री सैनिक आणि इतर देशांतील लोकांना युद्धात जबरदस्तीने पाठवल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानी सरकारने देशातील तरुणांना रशियन सैन्यात भरती न होण्याचा सल्ला दिला आहे. तसेच रशियाकडून देण्यात येत असलेल्या कोणत्याही ऑफरपासून दूर राहण्यास सांगितले आहे. आतापर्यंत रशियात जे हिंदुस्थानी तरुण गेले आहेत, त्या तरुणांची रशियाने तत्काळ सुटका करावी, अशी विनंती हिंदुस्थान सरकारकडून रशियाकडे करण्यात आली आहे.
हरयाणातील फतेहबाद येथील काही तरुण रशियन सैन्यात सहभागी झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या कुटुंबीयांना व्हिडीओ पाठवले असून यात म्हटले की, आमच्याकडे केवळ दोन ते तीन दिवस शिल्लक आहेत. त्यानंतर आम्हाला युक्रेनविरुद्धच्या युद्धात ढकलले जाईल. आतापर्यंत जो कोणी येथून गेला आहे, तो परत येत नाही. याआधी 13 ते 14 तरुण गेले. ते माघारी परतले नाहीत. सर्व मारले गेले आहेत, असे या तरुणाने म्हटले आहे.