अमेरिकी विमानांवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता, पाकिस्तानी हवाई हद्दीत न जाण्याच्या सूचना

895

अमेरिकेने त्यांच्या विमान कंपन्यांसाठी विशेष सूचना जारी केली आहे. या कंपन्यांनी त्यांची विमाने पाकिस्तानी हवाई हद्दीतून पाठवू नयेत अशा प्रकारची ह सूचना आहे. या सूचनेमध्ये अमेरिकी विमानांवर पाकिस्तानी हवाई हद्दीत दहशतवादी हल्ला होऊ शकतो आणि यामुळे पाकिस्तानची हवाई हद्द टाळावी असे म्हटले आहे. अमेरिकेच्या हवाई प्रशासनाने ही सूचना कंपन्यांना दिली आहे. 1 जानेवारीला इराकमध्ये अमेरिकी दुतावासाबाहेरची चौकी आंदोलकांनी जाळली होती. इथे जबरदस्त आंदोलन झालं होतं आणि यामागे इराणचा हात असल्याचा अमेरिकेला संशय होता. अमेरिकेने शुक्रवारी इराणच्या लष्करी अधिकाऱ्याला इराकमध्ये मिसाईल हल्ल्यात ठार मारलं आहे. या घटनांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने त्यांच्या विमान कंपन्य़ांना ही सूचना दिली आहे.

विमान कंपन्यांना दिलेल्या सूचनेत म्हटलंय की दहशतवादी संघटना आणि कट्टरपंथियांच्या निशाण्यावर अमेरिकेची विमाने असू शकतात. फार उंचावरून न उडणारी विमानांसाठी हा मोठा धोका ठरू शकतो. सध्याच्या परिस्थितीत प्रवासी वाहतूक करणाऱ्या विमानांनाही लक्ष्य केले जाऊ शकते.

अमेरिकेने इराकमधील इराण समर्थक गटावर हल्ला केला होता. या हल्ल्यात 25 जणांचा मृत्यू झाला होता. ज्यांना अमेरिकेने ठार मारलं ते अमेरिकेच्या एका कंत्राटदाराच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. या घटनेमुळे भडकलेल्या इराकमधील इराणी समर्थकांनी अमेरिकेच्या दुतावासाबाहेर मोठं आंदोलन केलं होतं. आंदोलकांना पांगवण्यासाठी अमेरिकी सैनिकांना अश्रूधुराचा वापर करावा लागला होता.

आपली प्रतिक्रिया द्या