निष्ठेच्या प्रवासाचा संघर्ष उलगडला, अ‍ॅड. मनमोहन चोणकर यांच्या गौरवग्रंथाचे प्रकाशन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई गॅस कंपनीचे कर्मचारी ते शिवसेनेचे नगरसेवक, मुंबईचे आद्य शिल्पकार नामदार नाना शंकरशेट यांच्या वडाळ्यातील स्मारकापासून ते मुंबई सेंट्रल टर्मिनसचे नाना शंकरशेट नामांतर असा प्रखर लढा देणारे ज्येष्ठ निष्ठावंत कडवट शिवसैनिक आणि नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे सरचिटणीस ॲड. मनमोहन चोणकर यांचा जीवनप्रवास मांडणाऱ्या ‘निष्ठेच्या प्रवासाचा संघर्ष’ या गौरवग्रंथाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी चोणकर यांनी नगरसेवकपदी असताना केलेल्या समाजहिताच्या कार्यापासून नाना शंकरशेट यांचे स्मारक व टर्मिनसच्या नामांतरासाठी उभारलेल्या लढ्याचा मान्यवरांनी गौरव केला.

माजी नगरसेवक मनमोहन चोणकर यांचा पंचाहत्तरी सोहळा दादर येथील सूर्यवंशी सभागृहात पार पडला. यावेळी शिवसेना नेते अरविंद सावंत, विधानसभेतील शिवसेनेचे गटनेते सुनील प्रभू, उपनेते अरविंद मिर्लेकर, शिवसेनेचे जनसंपर्कप्रमुख हर्षल प्रधान, नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेन्द्रभाऊ शंकरशेट, दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष समाजश्रेष्ठी डॉ. गजानन रत्नपारखी, समाजश्रेष्ठी दिनकर बायकेरीकर, दैसपचे उपाध्यक्ष डॉ. आनंद पेडणेकर यांच्या हस्ते “निष्ठेच्या प्रवासाचा संघर्ष’’ या गौरव ग्रंथाचे अनावरण करण्यात आले. यावेळी बोलताना खासदार अरविंद सावंत यांनी मुंबईच्या आद्यशिल्पकाराची ओळख जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी चोणकर यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याची आठवण करून दिली. नानांप्रती शिवसेना कृतज्ञ आहे आणि त्यासाठीच मुंबई सेंट्रल टर्मिनसचे नाना शंकरशेट टर्मिनस असे नामांतर होईपर्यंत संसदेत आवाज उठवत राहीन, अशी ग्वाही सावंत यांनी दिली. सुनील प्रभू यांनी वडाळ्यातील नानांच्या स्मारकासाठी मिळालेला भूखंड हा केवळ चोणकरांच्या पाठपुराव्यामुळेच मिळाला असे सांगितले. मुंबई सेंट्रल टर्मिनसचा लढा नामांतर होईपर्यंत लढत राहीन, असा निर्धार यावेळी चोणकर यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री शीतल क्षीरसागर यांनी केले.