हिंदुस्थानी महिला फुटबॉल संघाचा ऐतिहासिक विजय

हिंदुस्थानी महिला फुटबॉल संघाने ताश्पंतमधील एएफसी महिला आशियाई चषक पात्रता स्पर्धेतील सामन्यात मंगोलियाचा 13-0 गोल फरकाने धुव्वा उडवीत ऐतिहासिक विजय मिळवला. हा हिंदुस्थानी महिला संघाचा एएफसी सामन्यातील आजवरचा सर्वात मोठा विजय ठरला आहे.

हिंदुस्थानच्या या मोठय़ा विजयात प्यारी झाक्साने पाच गोल केले, तर ग्रेस डांगमेईनेही चमकदार कामगिरी केली. सामना संपल्यानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक क्रिस्पीन छेत्री यांनी समाधान व्यक्त केले, पण संघाच्या फिनिशिंगमध्ये अजून सुधारणा होण्याची गरज असल्याचेही नमूद केले.

हा सामना हिंदुस्थानी महिला फुटबॉल संघाच्या इतिहासातील चौथ्या सर्वात मोठय़ा विजयानंतर गणला जातो. याआधी केवळ सहा महिन्यांपूर्वी हिंदुस्थानने बंगळुरूमध्ये मालदीववर 14-0 असा विजय मिळवला होता. हिंदुस्थानने भूतानवर 18-0 गोल फरकाने मिळविलेला आजवरचा सर्वात मोठा विजय होय.

हिंदुस्थानी संघाचा हा 13-0 गोल फरकाचा मोठा विजय पुढील वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या एएफसी महिला आशियाई कपसाठी पात्रतेच्या गटात अव्वल स्थान मिळवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.

संघाचे मुख्य प्रशिक्षक क्रिस्पीन छेत्री म्हणाले, ‘‘कधी कधी केवळ स्कोअरलाईनकडे पाहून थांबायचे नसते, पुढे जायचे असते. आपले काम गोल करणे हे आहे आणि ते आपल्याला सातत्याने करत राहावे लागेल. प्रतिस्पर्धी कोणताही असला, तरीही गोल करणे नेहमीच सोपे नसते. मात्र आपण अधिक परिणामकारक आणि व्यावसायिक पद्धतीने खेळत, मिळणाऱ्या प्रत्येक संधीचे सोने करणे गरजेचे आहे. आम्ही त्यामध्ये अधिक चांगले होऊ शकतो, हे मला ठाऊक आहे.’’