
पालिकेसोबत जागेसाठी केलेला 99 वर्षांच्या लिजचा करार संपल्यानंतरही रेसकोर्सने पालिकेचे 5 कोटी 99 लाखांचे भाडे थकवल्याने वसुलीसाठी पालिका आता रेसकोर्सकडून हमीपत्र घेणार आहे. यासाठी लवकरच पालिका टर्फ क्लबला याबाबत पत्रही देणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. थकीत भाडय़ासाठी हमीपत्र घेण्यात येणार असले तरी पुन्हा जागेसाठी करारपत्र करण्यात येणार नाही, अशी भूमिकाही पालिकेने मांडली आहे. महालक्ष्मी रेसकोर्सची जागा रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला 1914 मध्ये 99 वर्षांच्या करारावर दिली होती. 1964 मध्ये हा भाडेकरार 30 वर्षांसाठी वाढवण्यात आला. 1994 मध्ये पुन्हा 14 वर्षांसाठी भाडेकरार वाढवण्यात आला. त्यावेळी वर्षाला 19 लाख रुपये जागेच्या भाडय़ाचा दर निश्चित केला होता. यामध्ये भाडय़ामध्ये वर्षाला 2 लाखांची वाढ करण्याचा निर्णय झाला होता. यानुसार क्लबने 2013 मध्ये करार संपताना 56 लाख भरले. मात्र टर्फ क्लबने अजूनही जागेचा ताबा सोडलेला नाही.

























































