
धक्कादायक निकाल नोंदविण्याची क्षमता असलेले अफगाणिस्तान व स्कॉटलंड हे दोन संघ सोमवारी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आपल्या अभियानास प्रारंभ करतील. कागदावर तरी अफगाणिस्तानचा संघ थोडा सरस वाटत असला तरी स्कॉटलंडमध्येही तोडीस तोड खेळ करण्याची क्षमता आहे. त्यामुळे उभय संघांमध्ये एक तुल्यबळ लढत बघायला मिळणार आहे.
अफगाणिस्तानमध्ये सत्तांतर होऊन तालिबानची सत्ता आल्याने तेथील क्रीडा क्षेत्र विस्कळीत झाले. अशा प्रतिकूल परिस्थितीतही अफगाणिस्तानने सराव सामन्यात गतविजेत्या वेस्ट इंडीजला धूळ चारून प्रतिस्पर्धी संघांना इशारा दिला आहे. हजरतुल्लाह जजाई व मोहम्मद शहजाद या सलामीच्या जोडीकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा आहे. मधल्या फळीत नजीबुल्लाह जदरान व कर्णधार मोहम्मद नबी कुठल्याही गोलंदाजीची पिसे काढण्याची क्षमता बाळगून आहेत.
सामना फिरविणारे गोलंदाज
अफगाणिस्तानकडे जगातील सर्वोत्तम फलंदाजांना बाद करणारे गोलंदाज आहेत. राशिद खान, मोहम्मद नबी व मुजीब जदरान या फिरकी त्रिकुटामध्ये कुठल्याही संघाविरुद्ध सामना फिरविण्याची क्षमता आहे. शारजाहच्या खेळपट्टीवर चेंडू खाली राहतो. त्यामुळे अफगाणिस्तानच्या गोलंदाजीसाठी ही उपयुक्त खेळपट्टी होय.
स्कॉटलंडचे मनोबल उंचावलेले
पात्रता फेरीत तिन्ही सामने जिंकल्यामुळे स्कॉटलंडचे मनोबल कमालीचे उंचावलेले आहे. यात त्यांनी बांगलादेशसारख्या तगडय़ा संघालाही पराभवाचा धक्का दिला. त्यामुळे उद्याची लढाई अफगाणिस्तानसाठी नक्कीच सोपी नसेल. ब्रेडली व्हील व जोश डेवीने नवीन चेंडूवर प्रभावी कामगिरी केली आहे. डावखुरा मार्क वॉटमधल्या षटकांमध्ये उपयुक्त गोलंदाजी करू शकतो. कर्णधार काइल कोएत्जर, रिची बेरिंगटन डायलन बज, मॅथ्यू क्रॉस असा चांगला फलंदाजीक्रमही स्कॉटलंडच्या दिमतीला आहे. त्यामुळे उद्या अफगाणिस्तान-स्कॉटलंडमध्ये एक तुल्यबळ लढत अपेक्षित आहे.

























































