
तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केरल्यानंतर पहिल्यांदाच अफगाण दहशतवाद्यांनी हिंदुस्थानात घुसखोरी केल्याची बातमी समोर येत आहे. गुप्तचर संस्थांनी मोठा हल्ला होण्याची शक्यता व्यक्त करत अलर्ट जाहीर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांच्या निशाण्यावर देशातील मोठ्या सरकारी संस्था आणि हिंदुस्थानी सैन्याचे कॅम्प असू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
उरी सेक्टरमधील एका पोस्टवर कुंपणाची तार कापून अफगाण दहशतवाद्यांनी घुसखोरी केली आहे, अशी माहिती मिळत आहे. त्याचवेळी पाकिस्तानी दहशतवादी पाकिस्तानात परतत असताना दहशतवाद्यांशी हिंदुस्थानी सुरक्षा दलांची चकमक झाली, ज्यात एक जवान जखमी झाला आहे. दहशतवाद्यांकडून प्राणघातक शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. गुप्तचर अहवालात हे स्पष्टपणे लिहिले आहे की, 18 सप्टेंबर 2021 रोजी उरी सेक्टरमधील एका पोस्टमधून पाच अफगाण दहशतवादी हिंदुस्थानात घुसले आहेत.
दरम्यान, हिंदुस्थानी सैन्याकडून उरी सेक्टरमध्ये शोधमोहीम राबवली जात आहे. हे पाच दहशतवादी अफगाणिस्तानातून आले आहेत. त्यामुळे ते काश्मीरमधील लोकांमध्ये सहजपणे मिसळू शकत नाहीत. सुरक्षा दले त्यांचा शोध घेत असून सर्व संशयास्पद ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत.




























































