
ब्रिटिशकाळातील ऐतिहासिक वास्तू असलेली, अनेकांचे सुख-दुःख पचविणारे महापालिकेचे डफरीन हॉस्पिटल पुन्हा नव्या रूपात, नव्या उमेदीने सुरू झाले आहे. मागील 20 दिवसांत 68 प्रसूती झाल्या असून, त्यातील 12 सिझेरियन प्रसूती होत्या. तब्बल 30 वर्षापासून बंद पडलेल्या हॉस्पिटलमध्ये चांगल्या दर्जाची रुग्णसेवा मिळत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळण्याबरोबरच ऑपरेशनवर होणाऱ्या खर्चाचा ताणही कमी झाला आहे.
डफरीन चौवातील महापालिकेच्या राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रसूती रुग्णालयाची उभारणी 18व्या शतकातील आहे. गेल्या दीडशे वर्षामध्ये सोलापूरकरांच्या सेवेत असलेले हे रुग्णालय अनेकांच्या सुख-दुःखांचे साक्षीदार आहे. सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांचे जीवनवाहिनी ठरलेले हे हॉस्पिटल अलीकडच्या चाळीस वर्षापासून दुर्लक्षित झाले होते.
दरम्यान, महापालिकेने बालाजी अमाइन्स या कंपनीकडून या डफरीन हॉस्पिटलला नवसंजीवनी देण्यासाठी मागील वर्षभरापासून धडपड केली. अखेर 25 फेब्रुवारी 2023 मध्ये हे प्रयत्न यशस्वी झाले. अहिल्यादेवी होळकर प्रसूतिगृह अत्याधुनिक करण्यात आले आहे. याठिवाणी आवश्यक तेवढे डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
फाइव्ह स्टार ऑपरेशन थिएटर अन् स्मार्ट आयसीयू सेंटर, अद्ययावत प्रसूतिगृह, लेबररूम, नवीन साहित्य व मशीन, गरोदर महिलांना पायरी चढताना त्रास होऊ नये म्हणून लिफ्टची सोय अन् एकाच दिवसात सुमारे 50 महिलांच्या प्रसूती होतील, अशी सुविधा उपलब्ध करून दिली. खासगी हॉस्पिटलमध्ये होणारा सर्वसामान्यांचा खर्च आता वाचणार असल्याने प्रशासकीय कारकिर्दीतील हे वार्य सोलापूरकरांना दिलासा देणारे आहे.
आवश्यक साधनसामुग्री नसल्याने सिझेरियनसह इतर प्रसूतीही बंद होत्या. मात्र, आता हॉस्पिटलला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अत्याधुनिक मशिनरीसह नूतनीकरण केलेल्या इमारतीमध्ये काम करताना कर्मचाऱ्यांचाही उत्साह वाढतो. अनेक नागरिक फोन करून अपॉइंटमेंट मागतात, पण इथे येण्यासाठी कोणाचीही अपॉइंटमेंट घेण्याची गरज नाही. सोलापूरकरांनी महापालिकेच्या दवाखान्यांतील सुविधांचा लाभ घ्यावा.
डॉ. बसवराज लोहारे, महापालिका आरोग्याधिकारी.






























































