शस्त्रसंधीच्या 43 तासांनी उघडली 32 विमानतळे

हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाल्याच्या 43 तासांनी आज नऊ राज्यांतील 32 विमानतळे प्रवाशांसाठी खुली झाली. विमान कंपन्यांनी तिकीट बुकिंग सुरू केली आहेत. ही 32 विमानतळे 9 मेपासून 15 मेपर्यंत पहाटे साडेपाच वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती.

विमानतळ प्राधिकरणाने आज प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून विमानतळे पुन्हा सुरू करण्यात आल्याची माहिती दिली. 15 मेपर्यंत बंद ठेवण्यात येणारी 32 विमानतळे आता तत्काळ प्रभावाने सुरू करण्यात आली आहेत. प्रवाशांना विमान उड्डाणांची माहिती विमान कंपन्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेंतर्गत पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानने सीमेवर गोळीबार आणि ड्रोन तसेच क्षेपणास्त्र हल्ला सुरू केला. त्यामुळे नागरी उड्डाण मंत्रालयाने 10 मे रोजी नऊ राज्यांतील 32 विमानतळे बंद करण्याचा निर्देश दिले होते.

तीन दिवसांत 500 हून अधिक उड्डाणे रद्द

विमानतळे बंद झाल्यामुळे तीन दिवसांत तब्बल 500 हून अधिक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली होती. प्रवाशांना फुल रिफंड आणि फ्लाइट रिशेडय़ूलचा पर्याय देण्यात आला होता, मात्र युद्धबंदीनंतर सीमेवरील परिस्थिती नियंत्रणात येऊ लागली आणि सर्व राज्यांतील जनजीवन सामान्य होऊ लागले. त्यामुळे विमानतळे पुन्हा सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. दरम्यान, पंजाबच्या फिरोजपूरमध्ये रद्द करण्यात आलेल्या आठ ट्रेन पुन्हा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. तर गुजरातहून राजस्थानला जाणाऱया रेल्वेगाडय़ा पुन्हा सुरू करण्यात आल्या.