
गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसाचे संकट ओढवले असतानाच आज सकाळी जव्हार भूकंपाच्या धक्क्याने हादरून गेले. 2.7 रिश्टर स्केलचे लागोपाठ दोन धक्के बसल्याने शेकडो ग्रामस्थ भीतीने घराबाहेर पळाले. अनेकांच्या घरांना भेगा पडल्या असून हजारो जव्हारवासीय भयभीत झाले आहेत. डहाणूनंतर आता जव्हारमध्ये थरथराट होऊनही ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी सरकारी यंत्रणेने कोणतीच उपाययोजना न केल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
जव्हार तालुक्याची लोकसंख्या सुमारे सव्वा लाख असून यावर्षी दुसऱ्यांदा हा भूकंप झाला आहे. आज सकाळी धक्का बसल्यानंतर अनेकजण घरात जायलाही घाबरत आहेत. जव्हारमध्ये घरोघरी गणपती बसला असून बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे. त्यातच आज सकाळी भूकंप झाल्याने नवे ‘विघ्न’ उभे राहिले. भूकंपाचे वृत्त समजताच जव्हारचे तहसीलदार संतोष शिंदे यांनी भूकंपग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी आमच्या सुरक्षेचे काय, असा सवाल ग्रामस्थांनी केला.
भूकंपमापन यंत्रच गायब
जव्हारचा भाग हा भूकंपप्रवण असल्याने दिल्लीच्या केंद्रीय पथकाने एप्रिल 2018 मध्ये वाळवंडा या भागात भूकंपमापन यंत्र बसवले होते. पण तीन महिन्यांनी ते काढून नेण्यात आले. त्यामुळे जव्हारमध्ये झालेल्या भूकंपाचे रिश्टर स्केल मोजण्यासाठी पालघरमधील भूकंपमापन यंत्राचा आधार घ्यावा लागत आहे.
तलासरी, डहाणू, पालघरच्या परिसरात गेल्या दोन वर्षांपासून भूकंपाचे धक्के बसत आहेत. विशेषतः धुंदलवाडी या भागात तर अनेक वेळा भूकंप झाल्याने भीतीने ग्रामस्थांची गाळण उडाली आहे. या भूकंपाने आतापर्यंत दोन बळी घेतले असले तरी हा थरथराट आता जव्हार, मोखाडय़ापर्यंत येऊन पोहोचला आहे. आज सकाळी 7 वाजून 46 मिनिटांनी जव्हारमध्ये भूकंपाचा पहिला धक्का बसला. त्यानंतर दहा मिनिटांनी लगेच दुसऱयांदा भूकंप झाल्याने भीतीने लहान मुले, महिला, वृद्धांनी मोकळ्या मैदानाकडे धाव घेतली.




























































