पावसाचा जोर ओसरला… ज्वर पसरला! सर्दी, खोकला आणि तापाच्या साथीचा वेढा

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह उपनगरात पावसाला सुरू झाली. रविवार आणि सोमवारी पावसाने मुंबईत अक्षरशः धुमशान घातले. आज पावसाचा जोर ओसरला. परंतु, ज्वर पसरल्याचे चित्र आहे. मुंबईकर सर्दी , खोकला आणि तापाच्या साथीच्या वेढय़ात सापडले आहेत. दवाखान्यांमध्ये, रुग्णालयांच्या ओपीडीत मलेरिया, डेंग्यू, कावीळ, टायफॉईडच्या रुग्णांची गर्दी पावसाला सुरुवात झाल्यापासून दिसू लागल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.

वादळी वाऱयासह आलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत किंग्ज सर्कल, दादर टीटी, परळ, मस्जिद बंदर, वरळी, अंधेरी, जोगेश्वरी कांदिवली, मालाड, बोरिवली, वरळीतील आचार्य अत्रे चौक येथे मोठय़ा प्रमाणावर पाणी भरले. गुडघाभर पाण्यातून चाकरमान्यांना वाट काढत रेल्वे स्थानके गाठावी लागली. सगळीकडे चिखलाचे आणि घाणीचे साम्राज्य पसरले. लोकांच्या घरात गटाराचे पाणी गेले. हे पाणी आता ओसरले असले तरी साथीचे आजार मोठय़ा प्रमाणावर पसरण्याची शक्यता असल्याची माहिती सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली.

दिवसाला 90 ते 100 रुग्ण

गेल्या काही दिवसांपासून मुबंईसह उपनगरात ढगाळ वातावरण आणि रात्री मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे दवाखान्यात येणाऱया तापांच्या रुग्णांचे प्रमाण प्रचंड आहे. दिवसाला तब्बल 90 ते 100 रुग्ण दवाखान्यात येत आहेत, अशी माहिती कांदिवली येथील फॅमिली फिजीशियन डॉ. संजीव कुदळे यांनी दिली.अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य असल्याने आणि वातावरण अजूनही ढगाळच असल्याने तापाच्या रुग्णांची संख्या वाढू शकते, असे डॉ. कुदळे यांनी सांगितले.

लहान मुलांना सांभाळा

विविध ठिकाणी सखल भागात, झोपडपट्टय़ांमध्ये, चाळींमध्ये गटाराचे पाणी शिरले. अनेक ठिकाणी अजूनही चिखल आहे. अशा परिस्थितीत लहान मुलांना सर्वाधिक सर्दी, खोकला, तापाचा संसर्ग होऊ शकतो. तापाची लक्षणे दिसल्यास तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. डेंग्यू, मलेरिया, कावीळ अशा आजारांचा संसर्गही लहान मुलांना होऊ शकतो, अशी माहिती वाडिया रुग्णालयाच्या डॉ. मिनी बोधनवाला यांनी दिली.

40 टक्के रुग्ण तापाचे

रुग्णालयाच्या ओपीडीत सध्या 40 टक्के रुग्ण सर्दी, खोकला आणि तापाचे येत आहेत. पुढच्या दोन दिवसात यात आणखी वाढ होईल अशी माहिती जे जे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक संजय सुरासे यांनी दिली. तर अनेक रुग्णालयात सध्या 25 ते 30 टक्के रुग्ण सर्दी, तापाचे येत आहेत. पुढील दोन दिवसात ही संख्या आणखी वाढू शकते अशी माहिती, नायर रुग्णालयातील कान, नाक आणि घसा शस्त्रक्रिया विभागाच्या विभागप्रमुख डॉ. बची हाथीराम यांनी दिली.

वरळीतील मेट्रो स्थानक अनिश्चित काळासाठी बंद

मुंबई पहिल्याच पावसाच्या तडाख्याने खड्डय़ात गेली असून रस्त्यांवर मुंबईकरांना जणू चंद्रसफरच घडत आहे. दुसरीकडे सोमवारी पाण्यात बुडालेले वरळीतील आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहे.